पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 23,926 कोटी रुपयांच्या (24 हजार कोटी) निधीची तरतूद केली आहे. ही तरतूद 2009-14 च्या सरासरी बजेटच्या (1,171 कोटी) तुलनेत तब्बल 20 पटीने अधिक असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी (दि. 02) दिली.
ते म्हणाले, अमृत भारत स्थानक योजनेसाठी महाराष्ट्रातील 132 स्थानके जागतिक दर्जाची करण्यासाठी निवडली गेली आहेत. या आधुनिकीकरणासाठी 5,675 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. लासलगाव, चिंचपोकळी, परळ आणि आमगाव यासारख्या एकूण 17 स्थानकांचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.
राज्यात 2014 पासून सुमारे 2,400 कि.मी. नवीन रेल्वेमार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, 3,744 कि.मी. मार्गाचे काम झाले आहे.
रेल्वेसुरक्षेसाठी ‘कवच’ या स्वदेशी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. राज्यात 576 कि.मी. मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित असून, 3,617 कि.मी.चे काम प्रगतीपथावर आहे. एकूण 4 हजार 981 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यास मंजुरी मिळाल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात 1,228 उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी राज्यात 1,228 उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी यावेळी नमूद केले की, सध्या राज्यात एकूण 1,70,058 कोटी रुपयांची विविध रेल्वेकामे प्रगतिपथावर आहेत. या प्रचंड गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून, सुरक्षितता आणि वेगवान प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.