पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील तृतीय वर्षाच्या ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) संधी मिळवून देण्याचे आव्हान उच्चशिक्षण संचालनालयासमोर आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे (एमएसएफडीए) कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. ,
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवीस्तरावरच विद्यार्थी रोजगारक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगांमध्ये जाऊन कार्यप्रशिक्षण, संशोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या रचनेनुसार पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. त्यातील चौथे वर्ष संशोधनाचे असेल, तर तिसऱ्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना पदवी मिळण्याची तरतूद आहे.
त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांनी कार्यप्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आधी राज्यातील १५०हून अधिक स्वायत्त महाविद्यालयांत करण्यात आली आहे. त्यानंतर संलग्न महाविद्यालयांमध्ये नवा पदवी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. स्वायत्त महाविद्यालयांच्या तुलनेत संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या बरीच जास्त आहे. त्यामुळे आता पदवीच्या सहाव्या सत्रात ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण मिळवून देण्याचे आव्हान आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. देवळाणकर म्हणाले, विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील कोणत्या क्षेत्रात कार्यप्रशिक्षण करू शकतील याचा अहवाल तयार करणार आहेत. त्या अहवालाचे संकलन करून पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. जेणेकरून अन्य महाविद्यालये, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. विद्यार्थी एखादा व्यावसायिक, उद्योजक, संस्था, कंपन्या अशा कोणत्याही ठिकाणी त्यांचे कार्यप्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र सादर करू शकतात. जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळू शकेल.
झारखंड, तामिळनाडूला मदत
झारखंड सरकारने त्यांच्या राज्यातील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेची निर्मिती करण्यासाठी एमएसएफडीएच्या प्रशासनाने सहकार्य केले असून, आता तेथील प्राध्यापकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही एमएसएफडीएकडून पार पाडण्यात येत आहे. त्यासाठी झारखंड सरकारशी करार करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने तामिळनाडू येथेही संस्थेच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्यासाठी एमएसएफडीएला विचारणा करण्यात आल्याचे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.
अध्यापक विकास संस्थेद्वारे २० हजारांहून अधिक प्राध्यापकांचे प्रशिक्षण
संस्था स्थापन झाल्यापासून आतापर्यंतच्या सहा वर्षांत राज्यातील २० हजारांहून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात नेतृत्वगुण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय शिक्षण अशा विविध विषयांचा समावेश असेल असेही डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले.