पुणे : यंदा एप्रिलपासून ला-निनाची स्थिती निवळत असून अल-निनो सक्रिय होत आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच मराठी पंचांगातदेखील हाच अंदाज देण्यात आला आहे. खरीप पिकांना ताण पडणार असला तरी सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ती कसर पाऊस भरून काढणार असल्याने रब्बी पिके चांगली येतील, असेही अंदाजात म्हटले आहे.
यंदा एप्रिलअखेर अल-निनोची स्थिती सक्रिय होत असल्याने आगामी पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्य शासन देखील पाण्याचे नियोजन करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात काही दिवसांपूर्वी दिली होती.
गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते. त्यानिमित्ताने पंचांगाची खरेदी होते. यात वर्षभराचे फल म्हणजेच भाकीत दर्शवलेले असते. यंदाच्या दाते पंचांगातही कमी पावसाचे भाकीत दिले आहे. वर्षा ऋतूत कमी पाऊसमान राहील. त्यामुळे खरीप पिकांना पाण्याची ओढ बसेल. मात्र पावसाळा संपताना जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिके चांगली येतील, असेही अंदाजात म्हटले आहे.
गरम जमीन, थंड हवा अन् जोरदार वाऱ्यामुळे गारपीट
पुणे : राज्यातील बहुतांश भागात गत दोन दिवसांपासून गारपिटीसह पाऊस सुरू आहे. गरम जमीन, थंड हवा, जोरदार वारे यांसह कमी दाबाचा पट्टा अन् पश्चिमी चक्रावाताचा हा परिणाम असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही बहुतांश भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात गारपीट, पाऊस, वादळी वारे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
या अवकाळी पावसाचा जोर विदर्भ व मराठवाड्यात जास्त आहे. कारण या भागात हवेचा दाब कमी झाला आहे. हा पाऊस गत दोन दिवसांपासून सुरू असून शक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. इतका आहे. कोकण अन् मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रणालीमुळे असे वातावरण तयार झाले आहे. त्याला पश्चिमी विक्षोभ म्हणतात. हवेच्या वरच्या थरात थंड वारे तर खालच्या थरात उष्ण हवा असते. त्यामुळे वारे वरच्या दिशेने जास्त वाहते. पाण्याचे थेंब वरच्या दिशेने खेचले जाऊन त्याचे बर्फात रूपांतर होते. ते खाली येताच त्याचे गारांत रूपांतर होते. गरम जमीन, थंड हवा, जोरदार वारे या संगमामुळे गारांचा पाऊस पडत आहे.
शुक्रवारीही मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यात नाशिक, जालना, धाराशिव, वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांत गुरुवारी गारपीट व पाऊस झाला, तसाच शुक्रवारी देखील होऊ शकतो. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांना नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.