पणनमंत्री जयकुमार रावल तीन दिवस पुण्यात ठाण मांडून बैठका घेणार pudhari
पुणे

Maharashtra Marketing Department: ‘पणन’च्या धोरणात्मक निर्णयांची मुहूर्तमेढ?

पणनमंत्री जयकुमार रावल तीन दिवस पुण्यात ठाण मांडून बैठका घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पुढील तीन दिवसांत राज्याच्या पणन विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत. अनेक धोरणात्मक निर्णयांची मुहूर्तमेढ या दौर्‍यात होणार असून, पणन विभागाची स्वतंत्र आस्थापना तयार करणे महत्त्वपूर्ण आहे. (Latest Pune News)

पणनमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या जम्बो कार्यक्रमात बुधवारी (दि. 17) मार्केट यार्डातील राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाची सकाळी बैठक होत आहे. तर दुपारी राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था तथा एनआयपीएचटी संस्थेचा आढावाही घेतला जाणार आहे. तर, गुरुवारी (दि. 18) पणन मंडळामध्ये महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या टप्पा एकचा आढावा व टप्पा क्रमांक दोनच्या नियोजनाबाबत बैठक होत आहे. तसेच, दुपारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व बळकटीकरणाबाबत सादरीकरण होणार आहे.

शुक्रवारी (दि. 19) तळेगाव-मावळ येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेत म्हणजेच एनआयपीएचटीमध्ये पणन विभागाच्या स्वतंत्र आस्थापना व अन्य विषयांवर नेमलेल्या गोयल समितीबरोबर चर्चा आणि सादरीकरण होणार आहे. या तीन दिवसांच्या बैठक सत्रांद्वारे पणन विभागाच्या धोरणात्मक बाबींवर चर्चा अपेक्षित आहे. त्यातून पणन विभागस्तरावर धोरणात्मक निर्णय होऊन त्यातून काही प्रस्ताव मान्यतेसाठी पुढे मंत्रिमंडळापुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पणन मंडळात वशिलेबाजीला अटकाव घालणार का?

पणन मंडळाचे मुख्यालय आणि विभागीय कार्यालयातील वरदहस्त असलेल्या अधिकार्‍यांना हटविण्याची जुनी मागणी कर्मचारी-अधिकार्‍यांमधून बोलून दाखवली जात आहे. शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये खरी काम करणारी माणसे मुख्यालयात येऊन काम करू इच्छित असूनही त्यांचे परतीचे दोर कापण्यात तळ ठोकलेले अधिकारी धन्यता मानत आहेत. या कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या धुसफुशीचा परिणाम कामकाजावर होत असल्याचीही ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल स्वतः प्रशासन विभागाचा स्वतंत्र आढावा घेऊन झाडाझडती घेणार काय, याकडेही कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT