

पुणे : ‘पुणे ग्रँड सायकल टूर’ या स्पर्धेसाठी शहरातील 64.80 किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्ती व सौंदर्यकरणासाठी तब्बल 122 कोटी 97 लाख रुपयांच्या निविदा महापालिकेने काढल्या आहेत. मात्र, या कामांसाठी एस्टिमेट कमिटीची मंजुरी घेण्यात आलेली नसून, प्रत्यक्षात या कामात कोणताही नवीन रस्ता अथवा डांबरीकरण न करता केवळ रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रतिकिलोमीटर 1.89 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर फक्त दुभाजक रंगविणे, थर्मोप्लास्ट पट्टे, साइन बोर्ड लावणे, खड्डे दुरुस्ती किंवा अस्तरीकरणाच्या नावाखाली हा अवास्तव खर्च केला जाणार असल्याने या प्रशासनाने काढलेल्या निविदा वादाच्या भोवर्यात सापडल्या आहेत. (Pune Latest News)
टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा पुणे शहर व जिल्ह्यात होणार आहे. यामधील 75 किमीचा मार्ग पुणे शहरातून जात आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती सह अन्य सुधारणांसाठी 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. मात्र, निविदेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिकेकडून मागील तीन वर्षांत जवळपास 500 कोटी रुपये खर्चून शहरातील प्रमुख रस्त्यांची पाच पॅकेज करून 100 किलोमीटरहून अधिक रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या रस्त्यांची पाच वर्षांची जबाबदारी ठेकेदारांवर आहे. याशिवाय पथ विभागाकडून ‘मेंटेनन्स’ व ‘रिइन्स्टेटमेंट’ या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांत केली जातात.
केवळ औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातच रस्त्यांच्या दुरुस्ती, रिइन्स्टेटमेंट व चेंबर समपातळीकरणासह विविध कामांसाठी 2 कोटी 62 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी अशा कामांवर सुमारे 40 कोटी रुपये खर्च होत आहे, असे असताना त्या निधीतून रस्ते दुरुस्त केले असतील, तर पुन्हा हा खर्च कशासाठी? असा सवाल संस्थेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
या स्पर्धेचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. महापालिकेकडून तीन ते चार महिने आधीच निविदा काढणे अपेक्षित होते. मात्र, आता स्पर्धा जवळ आल्यानंतर कामासाठी केवळ साठ दिवसांची मुदत देत प्रशासनाने एवढ्या मोठ्या कामासाठी अवघ्या सात दिवसांची निविदा काढली आहे. त्यामुळे कमी कालावधीत कराव्या लागणार्या रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिकेकडून मात्र स्पर्धेचे कारण देत घाई गडबडीत ही कामे करण्याचे उद्योग सुरू आहे.
नवीन दोन लेनचा 5 ते 7 मीटर रुंदीचा डांबरी रस्ता बांधण्यासाठी जास्तीत जास्त तीन कोटी रुपये पुरेसे असतात. अशा परिस्थितीत नवीन रस्ता न करता हे केवळ दिखाव्याचे काम असून, महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा आपले पुणे, आपला परिसर या संस्थेच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, माजी नगरसेवक प्रशांत बधे व सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांसाठी पुन्हा एस्टिमेट तपासणी करून फेरनिविदा काढाव्यात, अशी मागणी या संस्थेच्या वतीने आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.