थेऊरच्या कारखान्याची 99.27 एकर जमीन 299 कोटींना खरेदी होणार
पुणे बाजार समितीला उपबाजारासाठीच जमीन वापर करता येणार
जमीन विक्री करता येणार नाही
उच्च न्यायालयातील रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून शासन निर्णय जारी
पुणे : थेऊर येथील यशंवत सहकारी साखर कारखान्याची सुमारे 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करावयाची असल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या यशवंत कारखान्याच्या जमीन खरेदीवर तूर्तास शिक्कामोर्तब झाले आहे. (Pune Latest News)
यशवंत कारखान्याचे कार्यक्षेत्र हवेली तालुक्यातील 97 गावे, दौंडमधील 17 गावे, खेड तालुक्यातील 15 गावे आणि शिरूर तालुक्यातील 20 गावे मिळून एकूण 149 गावे आहेत. या कारखान्याची सभासद संख्या 21 हजार 196 आहे. साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता 3500 मे.टन प्रतिदिन एवढी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी अॅक्ट 2002 अंतर्गत हा कारखाना ताब्यात घेतला आहे. सध्या साखर कारखाना बंद असून, हा कारखाना चालू करण्याचा संचालक मंडळ व सभासदांचा मानस आहे.
त्यामुळे कारखान्याकडील विविध बँकांची थकीत कर्जे, परतफेड करणे, शेतकरी व कामगार यांची देणी, शासकीय व इतर देणी भागविणे, भांडवली उभारणी करावयाची आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेला थेऊर येथे उपबाजार आवाराकरिता यशवंत साखर कारखान्यानी सुमारे 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपये किंमतीस विक्री करण्यास कारखान्याच्या 26 फेब—ुवारी 2025 व 17 मार्च 2025 रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. शासनास तसा प्रस्ताव सादर साखर आयुक्तांनी सादर केला आहे. शिवाय जमीन खरेदी-विक्री करण्यास यशवंत कारखाना व पुणे बाजार समिती यांच्यातील 28 मार्च 2025 रोजी बाजार समिती मुख्यालयातील संयुक्त सभेत मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 12(1) नुसार मंजुरी प्रस्ताव पणन संचालकांनी शासनास 29 मे 2025 रोजी सादर केला आहे. साखर आयुक्त व पणन संचालकांकडून प्राप्त प्रस्तावानुसार यशवंतची जमीन विक्रीस शासनाने मान्यता दिली आहे.
यशवंतची 99.27 एकर जमीन 299 कोटी किंमतीस विक्री-खरेदी करण्यासाठी करावयाची कार्यवाही निश्चित करून कार्यवाही करावी.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन उपबाजारासाठी यशवंत कारखान्याची जमीन खरेदीस मान्यता देण्यात येत आहे. उपबाजाराच्या प्रयोजनार्थ जमिनीचा उपयोग करण्यात यावा. या जमिनीचा वापर उपबाजारासाठीच करावयाचा असून, जमिनीची विक्री अथवा अन्य प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
यशवंत कारखान्याच्या जमीन विक्रीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र. 5270/2025 दाखल केली असून, यामध्ये उच्च न्यायालयाने
दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करावी.
यशवंतच्या जमिनी विक्रीच्या अनुषंगाने भविष्यात न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची जबाबदारी यशवंत कारखाना व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची राहिल.