Food Adulteration Pudhari
पुणे

Maharashtra Food Adulteration Action: भेसळखोर व्यापाऱ्यांवर पणन विभागाचा बडगा; परवाना रद्द करण्याच्या सूचना

फळे-भाजीपाला आणि अन्नधान्यात घातक रसायनांचा वापर आढळल्यास कठोर कारवाई; बाजार समित्यांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार येथे व थेट पणनद्वारे खरेदी-विक्रीत भेसळखोरांना आता पणन विभागाने रडारवर घेतले आहे. त्यामध्ये शेतमालाच्या तपासणीअंती अन्नधान्य, फळे-भाजीपाला यामध्ये भेसळ, घातक रसायनांचा वापर केल्याचे आढळल्यास अन्न भेसळ करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याच्या महत्त्वपूर्ण परिपत्रकीय सूचना पणन संचालक शरद जरे यांनी बाजार समित्यांना दिल्या आहेत. तसेच त्या परवानाधारकास उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा काढून घेण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असेही म्हटले आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये बाजार समित्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी आहेत. शेती उत्पादकांचा माल योग्यरीतीने विकला जावा, तो फसवला जाऊ नये तसेच खरेदीदाराला एकत्रित माल मिळून सरस नीरस प्रत ठरविणे सोयीचे व्हावे. चांगल्या दर्जाचे शेतीमालाचे उत्पादन होण्यास उत्तेजन मिळण्यासाठी नियंत्रित बाजार क्षेत्रांची स्थापना करण्यात आली.

तसेच बाजार क्षेत्रातील खरेदी-विक्री संबंधाने भेसळ टाळण्यासाठी वजनमापेबाबत तक्रारी उद्भवल्यास त्याचे निराकरणाची बाजार समिती कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करता येईल.

बाजार क्षेत्रात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारामध्ये फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी आणि त्यांची गोडी वाढविण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर करणे, फळे-भाजीपाला व अन्नधान्यांना कृत्रिमरीत्या रंगविणे, फळे-भाजीपाला व इतर शेतीमाल दीर्घकाळ टिकविण्यासाठी तसेच आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणे

इत्यादी बाबी टाळण्यासाठी वेळोवेळी परवानाधारक व्यापाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून आवश्यक उपाययोजना करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. दैनंदिन भाजीपाला, फळे व फुले यांची विक्री, वाहतूक, साठवणासाठी दिलेल्या जाडीपेक्षा कमी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपुरक साहित्यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT