पुणे: राज्यात हिवतापाची (मलेरिया) रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात 2023 मध्ये मलेरियाचे 16,159 रुग्ण, 2024 मध्ये 21,079, तर 2025 मध्ये 22,838 रुग्णांची नोंद झाली आहे.
यामुळे 2030 पर्यंत हिवताप निर्मूलनाच्या उद्दिष्टासमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ साजरा केला जातो. राज्यातील आकडेवारीत वाढती प्रवृत्ती चिंताजनक ठरत आहे. गेल्या काही वर्षांत रुग्णसंख्येत चढ-उतार दिसत असले, तरी गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
चालू वर्षात 21 एप्रिलपर्यंत 2,720 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 236 रुग्ण हे बाहेरून आलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या घातक प्रकारामुळे मेंदूचा हिवताप होण्याचा धोका अधिक असून, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूची शक्यता वाढते. आरोग्य विभागाकडून डास नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी, अळीनाशक उपाययोजना, तसेच गप्पी मासे सोडण्यासारख्या जैविक पद्धतींचा वापर केला जात आहे.
ताप सर्वेक्षण, आशा व आरोग्य सेविकांमार्फत घराघरांत तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. तरीही पावसाळ्यापूर्वी डासोत्पत्ती रोखण्यात येणाऱ्या अडचणींमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना साजरा करून जनजागृती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तज्ज्ञांनी नागरिकांना साचलेले पाणी टाळणे, मच्छरदाण्यांचा वापर करणे आणि ताप आल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
हवतापाबाबत हे लक्षात ठेवा!
हिवतापाचा प्रसार : अनॉफेलिस मादी डासाच्या चाव्यामुळे
प्रमुख लक्षणे : थंडी वाजून ताप, डोकेदुखी, मळमळ, घाम
धोका अधिक : गर्भवती महिला व लहान मुले
प्रतिबंध : साचलेले पाणी टाळा, मच्छरदाणी वापरा, तापावर त्वरित तपासणी करा.