पुणे: राज्यभरात 11 हजार 150 सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यात सुमारे 20 हजार 321 कर्मचारी काम करत असून, तुटपुंजे वेतन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने ग्रंथालयीन कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शहरी असो वा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढीची घोषणा होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ग्रंथालयाचे अनुदान वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
आताच्या घडीला राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये आर्थिक अडचणीत आहेतच. पण, कमी वेतनामुळे काही कर्मचाऱ्यांनी तर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काहीजण दुसरीकडे काम मिळत नसल्याने नाइलाजाने हीच नोकरी करत आहेत. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना ग्रंथालयाच्या दर्जानुसार मिळणाऱ्या अनुदानातून वेतन दिले जाते.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ग्रंथालयांचा दर्जा बदल झालेला नाही. मध्यंतरी ग्रंथालयाच्या अनुदानात 40 टक्के वाढीची घोषणा करण्यात आली. यातून दिलासा मिळेल, असे ग्रंथालय प्रशासन आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वाटले होते. परंतु अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.
याविषयी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे म्हणाले, केरळ, कर्नाटक आणि गोवा सरकारकडून तेथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा 25 हजार रुपये वेतन दिले जाते. मग, महाराष्ट्रात असे निर्णय का होत नाहीत. आम्ही ग्रंथालयांचे अनुदान वेळेवर द्यावे आणि इतर मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. पण, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास जून महिन्यात पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान ते विधान भवनवर मोर्चा काढणार आहोत.
राज्यातील ग्रंथालय आणि कर्मचारीसंख्या
1) ग्रंथालयांची संख्या - अ वर्ग- 330, ब वर्ग - 2074, क वर्ग - 3974, ड वर्ग - 4777, एकूण ग्रंथालये - 11,155.
2) कर्मचारी संख्या - अ वर्ग - 1388, ब वर्ग - 6222, क वर्ग - 7948, ड वर्ग - 4777, एकूण कर्मचारी - 20,335.
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन
अ आणि ब वर्गाच्या ग्रंथालयातील ग्रंथपालांना अवघा 6 हजार ते 16 हजार पगार मिळतो, तर तालुकास्तरीय क वर्गीय ग्रंथालयातील ग्रंथपालास 7 हजार 200, तर त्याखालील ग्रंथालयातील ग्रंथपालास अवघे 4 हजार 800 पगार आहे. ड वर्गाच्या ग्रंथालयातील ग्रंथपालाची स्थिती तर आणखी बिकट आहे. त्यांना अवघे 2 हजार 223 रुपयांचाच पगार मिळतो. तर ग्रंथालयांमधील सहाय्यक ग्रंथपाल, निर्गम सहाय्यक, लिपिक आणि शिपाई यांनाही महिन्याला तुटपुंजा पगार असून, क आणि ड वर्गातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची स्थिती खूप कठीण आहे.