पुणे: जमीनविषयक विविध कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सेतू केंद्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या ‘भू-प्रणाम’ केंद्राची संख्या 100 च्या पुढे जाणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 30 ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू केली आहेत.
सध्या सुरू असलेली केंद्रही विभागाच्या जिल्हास्तरावरील कार्यालयात सुरू असून, पुढील टप्प्यात ती तालुकापातळीवरील कार्यालयात सुरू होणार आहेत.अत्याधुनिक सुसज्ज असलेल्या ‘भू-प्रणाम’ केंद्रामधून डिजिटल सहीचे सातबारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे, रंगीत नकाशे, त्याचबरोबर फेरफारमधील परिशिष्ट ‘अ’ आणि ‘ब’, नमुना क्रमांक 12 ची नोटीस, रिजेक्शन पत्र, निकाली पत्र, अपील निर्णयाची प्रत, फेरफार नोंदवहीचा उतारा, नमुना क्रमांक 9 ची नोटीस, अर्जाची पोच, त्रुटीपत्र, विवादग्रस्त नोंदवहीचा उतारा, या सेवा एकाच छताखाली देण्यात येत आहेत. (Latest Pune News)
या सेवा अत्यंत कमी दरात उपलब्ध केलेल्या आहेत. यापूर्वी नागरिकांना या प्रकारची शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यलायात अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत होते. तसेच, रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे अनेक कटकटी, समस्या नागरिकांना सहन कराव्या लागत होत्या.
मात्र, भूमिअभिलेख विभागाने सुरू केलेल्या ‘भू-प्रणाम’ केंद्रामुळे कार्यालयात जण्याची नागरिकांची कटकट आणि वेळ कमी होऊ लागला आहे. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने पहिल्या टप्प्यात 30 ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू केली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, ही बाब लक्षात घेऊन या केंद्रांची संख्या दुसर्या टप्प्यात आणखी 35 केंद्र सुरू होणार असून, ही केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे.
15 ऑगस्टपर्यंत ही केंद्र सुरू होणार आहेत. त्यानंतर तिसर्या टप्प्यातील आणखी 35 ‘भू-प्रणाम’ केंद्र डिसेंबरअखेरीस सुरू होणार आहेत. वर्षअखेरीपर्यंत एकूण 100च्या आसपास ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू होतील.
ऑनलाईन पूर्तता करता येणार
या भू-प्रणाम केद्राच्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या मिळकत पत्रिका काढण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्जामधील त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन पूर्तता करता येणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यात 30 ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू केली. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार दुसर्या टप्प्यातील 35 ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू करण्यासाठी कामे सुरू असून, ती ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कार्यान्वित होणार आहेत, तर तिसर्या टप्प्यातील 35 केंद्र डिसेंबर महिन्यात सुरू करण्याचा मानस आहे. साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन तरी केंद्र कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.- डॉ. सुहास दिवसे, राज्य आयुक्त, भूमिअभिलेख विभाग, पुणे