Tax deadline extended to July 7
पुणे: सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्याचा 30 जून हा शेवटचा दिवस असल्याने शहरातील विविध कर भरणा केंद्रांवर कर भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. यामुळे पालिकेच्या सर्व्हरवर ताण आल्याने दिवसभर सर्व्हर डाऊन होता. परिणामी, अनेक नागरिकांना कर भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
नागरिक तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभे होते. दरम्यान, सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. ही मागणी आयुक्तांनी मान्य करीत 7 जुलैपर्यंत कर भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Latest Pune News)
चालू आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाने 3250 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मिळकत कर भरावा यासाठी या वर्षी पालिकेने 30 जून पर्यंत करतात 5 ते 10 टक्के सवलत दिली होती. मे महिन्यापासून ही करवसूली सुरू करण्यात आली होती. सोमवार सवलतीचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली.
अनेक नागरिकांनी ऑनलाईन तर काहींनी क्षेत्रीय कार्यालयानुसार असलेल्या करभरणा केंद्रात जाऊन कर भरला. यामुळे अनेक केंद्रांवर नागरिकांचा रांगा लागल्या होत्या. चार ते पाच तास रांगेत थांबून देखील अनेकांना कर भरता आला नाही.
तर सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाइनदेखील कर भरता येत नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांसह क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या कर भरणा केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांना झालेला त्रास लक्षात घेत 7 जुलैपर्यंत सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यास महापालिकेने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
1245 कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत
1 मे पासून 30 जूनपर्यंत पाच ते दहा टक्के सवलत महापालिकेडून दिली जात होती. या काळात 7 लाख 10 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या सवलतीच्या फायदा घेत सुमारे 1245 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केल्याने सोमवारी सर्व्हरवर ताण आला. यामुळे काही नागरिकांना महापालिकेचा मिळकतकर भरण्यास अडचण आली. नागरिकांची झालेली गैरसोय बघता त्यांना पुन्हा सवलतीमध्ये मिळकतकर भरता यावा यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 जुलैपर्यंत मिळकत कर नागरिकांना भरता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पर्यायासह महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मिळकत कर भरावा.
- अविनाश सकपाळ, उपायुक्त, मिळकत कर विभाग, पुणे महापालिका