पुणे: एप्रिल व मे महिन्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भूमी अभिलेख विभागातील मोजणी कामे दुपारच्या वेळेत बंद ठेवावीत, अशी मागणी राज्यातील भूमी अभिलेख विभागातील संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
हवामान विभागाने या कालावधीत उष्णतेचा तीव इशारा दिल्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील वाढत्या उष्णतेचा विचार करून शासनाने आधीच कामगारांसाठी दुपारच्या विश्रांतीच्या वेळा जाहीर केल्या आहेत. या निर्णयाचे स्वागत होत असतानाच, भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी दररोज भरउन्हात शेतजमिनी व नगर भूमापनाशी संबंधित मोजणीची कामे करतात. ग््राामीण भागात ही कामे तीन ते चार किलोमीटर अंतरावर करावी लागतात. एकदा मोजणीचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत थांबवणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांना तीव उन्हाचा सामना करावा लागतो.
सध्या विभागातील कर्मचाऱ्यांना दररोज दोन वेगवेगळ्या गावांमध्ये मोजणीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. या गावांमधील अंतर साधारण 30 ते 40 किलोमीटर असल्याने सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत त्यांना बाहेरच काम करावे लागते.
या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यांत दररोज फक्त एका प्रकरणाची मोजणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करावे, अशी मागणी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी जमाबंदी आयुक्तांकडे केली आहे.