Sowing Pudhari
पुणे

Maharashtra Kharif Sowing Update: राज्यात खरिपाच्या ८४ टक्के पेरण्या पूर्ण; निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ८५ कंपन्यांविरोधात गुन्हे

मान्सूनचा सरासरीच्या ९४ टक्के पाऊस; १७ हजारांहून अधिक तक्रारींनंतर कृषी विभागाची कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात मान्सूनच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून, आत्तापर्यंत सरासरीच्या ९४ टक्‍के पर्जन्यमान झाले आहे. तसेच खरिपातील पिकांच्या एकूण ८४ टक्‍के पेरण्या पूर्ण झालेल्या असून, मका आणि सूर्यफुलाची पेरणी अधिक झालेली आहे. सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांच्या पुरवठाप्रकरणी दाखल तक्रारींवर विविध ठिकाणी संबंधित कंपन्यांविरोधात 85 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) बुधवारी (दि.29) सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, शेती कर्ज विभागाचे गिरीश जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यात सोयाबीन पिकाखाली 47.21 लाख हेक्टर क्षेत्र आहे.

त्यापैकी यंदा ४५ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीन उगवण क्षमतेबाबत 17 हजार 337 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आणि सुमारे २४ हजार 667 हेक्टर क्षेत्रावरील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रामुख्याने अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीद्वारा पाहणी केलेल्या प्रकरणांची संख्या 10 हजार 113 आहे. त्यातून सोयाबीन पिकाचे 7 हजार 811 बियाणे तपासणीसाठी घेतले होते.

बूस्टर, रवी हायब्रीड, श्री ओसवाल, यशोदा, पार्श्व कंपन्यांवर कारवाई

अप्रमाणित बियाणे पुरवठापक्ररणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा.लि., रवी हायब्रीड सीडस ॲण्ड रिसर्च, श्री ओसवाल सीडस, यशोदा व पार्श्व जेनेटिक्स एलएलपी यांचा समावेश आहे. तसेच संबंधित कंपन्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून देण्याच्या व नुकसानभरपाईच्या सूचना देण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले.

जुलैअखेर 20.73 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध

खरीप हंगामासाठी खतांचे मंजूर नियोजन 48.80 लाख मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात खरीपासाठी 50.80 लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. खरिपात आजअखेर 30.09 लाख मेट्रिक टन खतांची विक्री झालेली असून, दिनांक 27 जुलैअखेर 20.73 लाख मेट्रिक टन खतांचा शिलकी साठा आहे. त्यापैकी युरिया 5.21 लाख मे.टन, डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) 1.01 लाख मे. टन, म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) 94 हजार मेट्रिक टन, संयुक्त खते 9.55 लाख मे.टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) 4.02 लाख मेट्रिक टनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT