आशिष देशमुख
पुणे: गत सहा दिवसांत झालेल्या पावसाने राज्यातील एकूण ३५५ पैकी १४४ तालुक्यांनी जुलैची सरासरी १०० टक्के गाठली आहे. तर, ७७ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, ९५ तालुक्यांत ५० टक्के, तर ३९ तालुक्यांत २५ ते ५० टक्के इतका पाऊस झाला आहे. जुलैमध्ये एकही तालुका रेड झोनमध्ये नाही. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राने सरासरी गाठली. मात्र, मराठवाडा, विदर्भ अजूनही खूप मागे आहे.
जूनमध्ये राज्यात सर्वत्र खूप कमी पाऊस नोंदला गेला. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील ३५५ पैकी १४४ तालुक्यांनी १०० टक्के सरासरी गाठली आहे. मात्र, जून ते जुलै या दोन महिन्यांच्या सरासरीत मराठवाडा सर्वांत मागे असून, तेथे ३४ टक्के, तर विदर्भात २७ टक्के तूट आहे.
अतिवृष्टीचे जिल्हे (टक्के)
पालघर १८२ टक्के, ठाणे १६२ टक्के, पुणे १६२ टक्के, अहिल्यानगर १३७, रायगड १३८, नाशिक १२६ टक्के.
मुसळधारेचे जिल्हे (टक्के)
रत्नागिरी १०३, धुळे १०१, सातारा १२२, सांगली ११५, गोंदिया १०८, छत्रपती संभाजीनगर १००, जालना ८९, भंडारा ८४, सिंधुदुर्ग ७१, जळगाव ७०, कोल्हापूर ६६, धाराशिव ६१, हिंगोली ६०, बुलडाणा ६०, यवतमाळ ७२, गडचिरोली ७७, वर्धा ६८.
मध्यम पावसाचे जिल्हे (टक्के)
नंदुरबार ४६, सोलापूर ५६, बीड ५९, लातूर २९, नांदेड ४६, परभणी ४०, अमरावती ५६, अकोला ५३, वाशिम ५५, नागपूर ५८, चंद्रपूर ५४.
ऑगस्टमध्ये चांगला पाऊस
इन्सॅट ३ डी उपग्रहाने दिलेल्या चित्रानुसार देशाला चारही बाजूने बाष्पयुक्त ढगांनी वेढलेले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचे दाब ९९८ हेक्टा पास्कल इतका आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
एप्रिलपासूनच यंदा विदेशी संस्था आणि शास्त्रज्ञांनी यंदा भारतात कमी पाऊस पडणार, सुपर अल-निनो सक्रिय अशा वल्गना केल्या होत्या. मात्र, भारतीय हवामान विभागासह मी स्वतंत्र अंदाज दिला होता. त्यात काही भागांत ९० ते ९४, तर काही ठिकाणी १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज ३ जून रोजीच वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला.डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे