Maharashtra Heart Transplant Pudhari
पुणे

Maharashtra Heart Transplant: राज्यात हृदयदानाची कमतरता; ३ वर्षांत २८६ रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत

३७१ रुग्णांपैकी केवळ ८५ जणांवर हृदय प्रत्यारोपण; जनजागृती आणि कुटुंबीयांच्या समुपदेशनाची गरज

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: राज्यात गेल्या तीन वर्षांत ३७१ पैकी केवळ ८५ मृत रुग्णांचे (२२ टक्के) हृदय प्रत्यारोपण करण्यात आले असून, उर्वरित २८६ रुग्णांना (७८ टक्के) हृदयाची प्रतीक्षा असल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले, तर चालू वर्षात जुलै महिन्यापर्यंत १२९ रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अवयवदानाची संख्या वाढवण्याबरोबरच हृदयदानासाठी कुटुंबीयांचे समुपदेशन आणि जनजागृती करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

राज्य आणि प्रादेशिक अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्थेकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात मृत अवयवदानातून मिळणाऱ्या एकूण अवयवांची संख्या २०२३ मध्ये ४१९, २०२४ मध्ये ४७९ आणि २०२५ मध्ये ४३७ होती. त्यात मूत्रपिंड आणि यकृताचा वाटा मोठा आहे; मात्र हृदयदान अनुक्रमे ३३, २६ आणि २६ इतकेच राहिले म्हणजे २०२३ -२५ या तीन वर्षात २८६ जणांना (८० टक्के) हृदयाची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

हृदय प्रत्यारोपणावरील वैद्यकीय अभ्यासानुसार, हृदयदान हे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या गरजू रुग्णाला नवजीवन देण्याचे माध्यम आहे. मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यास हृदयविकाराच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला जीवनाची नवी संधी मिळू शकते. त्यामुळे हृदयदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून अधिकाधिक कुटुंबांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.

हृदय प्रत्यारोपणामध्ये वेळ अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. दाता उपलब्ध असलेल्या ठिकाणापासून प्रत्यारोपण केंद्रापर्यंत हृदय सुरक्षितपणे आणि निर्धारित वेळेत पोहोचवावे लागते. त्यामुळे राज्यातील भौगोलिक अंतर, वाहतूक व्यवस्था आणि उपलब्ध वाहतूक व्यवस्थापनातील अडचणींमुळे संबंधित हृदय योग्य वेळी प्रत्यारोपण केंद्रापर्यंत पोहोचवण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा परिस्थितीत समन्वयित वाहतूक व्यवस्था आणि तातडीची वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच हृदयदानाबाबत व्यापक जनजागृती आणि कुटुंबीयांचे समुपदेशन वाढल्यास प्रतीक्षेत असलेल्या अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सह्याद्री हॉस्पिटलचे हृदयविकारावरील सल्लागार डॉ. जगजित देशमुख यांनी सांगितले.

हृदय शस्त्रक्रिया आणि निवडक रुग्णांमध्ये हृदय प्रत्यारोपणाची गरज वाढत आहे. पारंपरिक उपचाराऐवजी आधुनिक उपचार पद्धतीत अनेक पर्याय आणि सुलभता आली आहे. ब्रेन-स्टेम डेथ आणि अवयवदानाबाबत जनजागृती वाढवून अवयव निकामी होण्यापूर्वी अधिकाधिक रुग्णांना वेळेत हृदय प्रत्यारोपण करून दुसरा जीव वाचवला जाऊ शकतो.
डॉ. हर्षल इंगळे, हृदयरोगतज्ज्ञ, रुबी हॉल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT