Pregnancy Pudhari
पुणे

Maharashtra FRU Centers Closed: राज्यातील 64 एफआरयू केंद्रे बंद; मातृ-बाल आरोग्य धोक्यात

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व अपुऱ्या सुविधांमुळे 27 टक्के केंद्रे निष्क्रिय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील 236 फर्स्ट रेफरल युनिट्‌‍स पैकी तब्बल 64 केंद्रे सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आणि पायाभूत सुविधांतील अडचणींमुळे कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एफआरयू ही मातृ व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत 24 तास आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी महत्त्वाची आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, सुमारे 27 टक्के एफआरयू सध्या बंद अवस्थेत आहेत.

उच्च जोखमीच्या प्रसूती हाताळणे, सिझेरियन शस्त्रक्रिया करणे, तसेच नवजात बालकांची विशेष काळजी घेणे, ही या केंद्रांची प्रमुख जबाबदारी आहे. प्रत्येक एफआरयूमध्ये स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ 24 तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता हीच सर्वांत मोठी अडचण ठरत आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू असणे किंवा ऑपरेशन थिएटर कार्यरत नसणे ही कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक विभागात सर्वाधिक 24 एफआरयू बंद

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नाशिक विभागात सर्वाधिक 24 एफआरयू बंद आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागात 8, कोल्हापूरमध्ये 7, ठाणे व छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी 6, लातूरमध्ये 5, तर अकोला आणि नागपूर विभागात प्रत्येकी 4 एफआरयू कार्यरत नाहीत.

एफआरयूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीने नियुक्ती, सर्व केंद्रे पूर्णपणे कार्यान्वित करणे, रक्तसाठा केंद्रे सुरू करणे किंवा खासगी रुग्णालयांशी समन्वय साधणे, तसेच उपचार पद्धतींची काटेकोर अंमलबजावणी याबाबत तातडीने कार्यवाही केली जात आहे.
प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT