पुणे: युद्धामुळे खते व कच्च्या मालाच्या आयातीवर विपरित परिणाम झाल्याचे सांगत राज्यात युरिया व डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) वगळता बहुतांश खतांची दरवाढ कंपन्यांकडून करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास अद्याप दीड महिन्यांचा कालावधी बाकी आहे. आगामी काळातही खतांचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून अनपेक्षितरीत्या खतांची आगाऊ मागणी वाढली आहे.परिणामे खतांचे दर 50 किलोच्या गोणीमागे 50 ते 750 रुपयांपर्यंत आत्ताच वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, रासायनिक खतांच्या दरवाढीचा विषय ऐरणीवर आलेला आहे.
कृषी विभागाच्या दाव्यानुसार युद्धजन्य परिस्थिती निवळली तर यंदा खत मुबलक उपलब्ध होऊ शकते. तर प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये खरीप हंगामातीसाठी शेतकऱ्यांकडून खतांची आगाऊ आणि वाढलेल्या दरातही खरेदी सुरू आहे.
केंद्र सरकारचे युरिया खत दरावर पूर्णपणे नियंत्रण आहे. त्यामुळे गेली सात ते आठ वर्षे कोणतीही दरवाढ न होता युरियाचे दर 45 किलोच्या गोणीस 266 रुपये 50 पैसे असे नियंत्रित व स्थिर आहेत. डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत नियंत्रणात नसले तरी शेतकऱ्यांना जादा दराने हे खत खरेदी करावे लागू नये, म्हणून डीएपीच्या 50 किलो गोणीचा दर 1350 रुपयांवर स्थिर असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाकडून मिळाली.
मात्र, उर्वरित खतांची दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून कंपन्यांना अनुदानित खतांबाबत पॉस मशीनवरील खते विक्रीच्या उपलब्ध माहितीनंतर विक्रीवर अनुदान दिले जाते. आखाती देशातून खतांची होणारी आयात ही युद्धजन्य स्थितीमुळे रोडावली आहे. तर दुसरीकडे खरीप पिकांसाठी आत्तापासूनच खते खरेदी करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर कोणी साठेबाजी करण्यासाठी खते खरेदी करून ठेवत आहे का? याची तपासणी मोहीम कृषी विभागाने हाती घेतलेली आहे.