पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुढच्या एका महिन्याच्या आत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला जाणार असून, खुद्द मुख्यमंत्री याची घोषणा करतील, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच कृषी विभागाच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी आता 'शेतकरी मित्र' ही नवी संकल्पना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पेरणी पुर्व कृषी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. याबाबत माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले की, "कर्जमाफीबाबतची सर्व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका महिन्याच्या आत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे." याशिवाय, मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची मदतही संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कृषी सहाय्यकांच्या मदतीसाठी आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'शेतकरी मित्र' योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात ११ हजार शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाईल. जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया पार पाडून या नियुक्त्या केल्या जातील. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती वेळेत उपलब्ध होईल.
वातावरणातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या 'एल-निनो'च्या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. मंत्री भरणे यांनी आज अधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घेऊन खरीप हंगामाचे नियोजन केले. येत्या काळात चारा आणि खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर (फिल्डवर) जाऊन मार्गदर्शन करावे, असे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.