

हिंगोली : केंद्र शासनाचा प्रस्तावित भारत- अमेरिका व्यापार करार तातडीने रद्द करावा या मागणीाठी हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
येथील महात्मा गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर सराफ, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत उर्फ बंटी नागरे, सुशांत लोखंडे, शांमराव जगताप, मिलींद उबाळे, शेख जुबेर मामू, संग्राम नायक, शेख अख्तर, अतुल नायक, विशाल इंगोले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारचा प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापारी करार हा देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था अन अन्नसुरक्षेस घातक ठरणारा आहे. या करारामुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शुन्य टक्के आयात शुल्क लागणार असून त्यामुळे स्वस्त विदेशी शेतीमाल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येतील. त्यामुळे भारतात शेतीमालाचे दर कोसळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
सदर करार शेतकऱ्यांसाठी असमान स्पर्धा निर्माण करणारा असून या करारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था व हमी भाव यांची उपयुक्तता कमी होईल. व्यापारी देखील स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्या ऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील. यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.