पुणे: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकरकमी समझोता (ओटीएस) योजनेसाठी राज्यभरातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभागाने प्रसिद्ध केल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून कर्जाच्या दोन लाख रुपयांवरील स्वतःच्या हिश्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्य शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेमध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहन, असे तीन घटक आहेत.
पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली असून, आत्तापर्यंत २५ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण केलेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकरकमी समझोता घटकांतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याची अतिरिक्त रक्कम बँकेत भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
यासाठी बँकांकडील माहितीचे संगणकीय संस्करण करून राज्यभरातील जिल्हा बँकांचे ६९ हजार ६३५ शेतकरी तर व्यापारी बँकाचे १ लाख १८५ मिळून एकूण १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बँकनिहाय यादी तपासून रक्कम जमा करण्याचे आवाहन
कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्थांच्या शाखा आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्ज खात्याचा तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, एकरकमी समझोता योजनेनुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमूद करून यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील काळजीपूर्वक तपासून स्वतःच्या हिश्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. एकाच बँकेत एकापेक्षा अधिक कर्ज खाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याची रक्कम कोणत्याही एका कर्ज खात्यात जमा करण्याची सुविधा आहे.
मात्र, संबंधित खात्यासाठी योजनेनुसार निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी रक्कम जमा केल्यानंतर संबंधित बँकेकडून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे.
एकरकमी समझोता योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेली ही पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण (पडताळणी) करून पुढील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून योजनेची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
१६ हजार १७९ शेतकरी एकरकमी कर्जफेड योजनेसाठी पात्र
कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार ७५० शेतकरी जिल्हा बँकेचे, तर २ हजार ४२९ शेतकरी व्यापारी बँकांचे आहेत.
जिल्हानिहाय दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकरीसंख्या
बीड ४२४७, छत्रपती संभाजीनगर ६४२९, जालना ७१५०, धाराशिव ४६४४, हिंगोली १९२५, लातूर ४६८२, नांदेड ५७६१, परभणी ४७५९. तसेच अहिल्यानगर २६७०३, नाशिक ९९६६, धुळे ४५२५, नंदुरबार ३४२५, जळगाव ३७६०.
कोकणात प्रामुख्याने
पालघर ५९९,
रायगड १००,
रत्नागिरी ५९०,
सिंधुदुर्ग ३७१,
ठाणे १३१९
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर २६४३,
सांगली ७९४६
सातारा ५५७८,
पुणे १६१७९,
सोलापूर ८,६०० तसेच उर्वरित नागपूर विभाग १२ हजार २ शेतकरी आणि अमरावती विभागातील २५ हजार ९१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.