

पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदवली जात असली, तरी प्रत्यक्षात दिवसा आणि रात्रीही थंडीचा अनुभव पुणेकरांना येत आहे.
विशेषतः सकाळी आणि रात्री हवेत गारवा जाणवत असून, संध्याकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे तापमानाचे आकडे वाढलेले दिसत असले, तरी वातावरणातील गारव्यामुळे थंडीचा प्रभाव कायम आहे.
शहरातील विविध हवामान केंद्रांवर नोंदविलेल्या तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. लोहगाव येथे सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर पुणे शहर, पाषाण, चिंचवड, लवळे आणि कोरेगाव पार्क येथे कमाल तापमान ३५ अंशांवर राहिले. दुसरीकडे, एनडीए येथे सर्वांत कमी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.
लवळे येथे १८.२, पुणे शहरात १९.५, तर लोहगाव येथे २०. ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मगरपट्टा आणि चिंचवड परिसरात किमान तापमान अनुक्रमे २३.१ आणि २३.२ अंशांवर राहिले. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांत तापमानातील फरक स्पष्टपणे जाणवत आहे.
दिवसा उन्हाचा चटका आणि सकाळ-संध्याकाळी गारवा, असे संमिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, आजही (शनिवारी) पुणे शहर आणि परिसरात संध्याकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात फारसा बदल नसला, तरी हवामानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.