

पुणे: विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुण्यातील घरातून अज्ञात व्यक्तीने ९० हजार ९१६ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये लुई व्हितॉन कंपनीची महागडी बॅग, ॲपल कंपनीचे एअरपॉडस्, कपड्यांचा सूट सेट आणि लिप पेन्सिल अशा वस्तूंचा समावेश आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोनाली तनपुरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वाहनावरील चालक संग्राम चंद्रभान तमनर (वय २२) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार तनपुरे यांची विमाननगर येथील लुंकड स्काय व्हिला सोसायटीत सदनिका आहे. २२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही चोरी झाली.
२२ ऑक्टोबर रोजी घरातील लुई व्हितॉन कंपनीची काळ्या रंगाची बॅग मिळून येत नसल्याचे त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी चालकाला सांगितले. त्यानंतर तमनर याने घरातील काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने बॅगचा शोध घेतला.
मात्र, ती मिळून आली नाही. काही दिवसांनी घरातील ॲपल कंपनीचे एअरपॉडस्, रबिया कंपनीचा सूट सेट आणि एम.ए.सी. कंपनीची लिप पेन्सिलही गायब असल्याचे निदर्शनास आले. सदनिकेत कामासाठी येणाऱ्या महिलांपैकी दोघींवर फिर्यादीने संशय व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. एकूण ९० हजार ९१६ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.