पुणे: नोंदणी विभागाची ‘ई- सर्च’ ही सेवा गेल्या आठवडाभरापासून ठप्प झाली आहे. सध्या या यंत्रणेद्वारे दिवसभरात एखादाच दस्त मिळू शकतो, असा अनेकांचा अनुभव आहे. नोंदणी विभागाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला असता, ई- सर्च सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याची माहिती मिळू शकत नाही.
तेथील कर्मचारी आम्ही आपली तक्रार संबंधितांपर्यंत पोहोचवितो, असे उत्तर देऊन फोन बंद करतात. नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक (आयटी) अभयसिंह मोहिते यांना याबाबत विचारले असता, माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले.
दस्तांचा शोध घेणे सोपे व सुलभ करण्यासाठी नोंदणी विभागाने गेल्या काही वर्षांपासून दस्त ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात 2002 नंतर नोंद झालेले दस्त अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले, तर आता 1985 ते 2001 या काळात नोंदविले गेलेले दस्तही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी जुने दस्त स्कॅन करून ते या सिस्टिमवर अपलोड करण्यात आले असून, वेगवेगळ्या दोन-तीन पद्धतीने त्यांचा शोध घेण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.
‘ई-सर्च’च्या निष्क्रियतेमुळे सर्व व्यवहार ठप्प
मालमत्ताची खरेदी-विक्री, टायटल रिपोर्ट, मालमत्ता तारण ठेवून घ्यावयाचे कर्ज यासाठी संबंधित मालमत्तांचा शोध अहवाल अत्यावश्यक असतो. तो वेळेत उपलब्ध झाला नाही, तर हे सर्व व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे ही व्यवस्था तातडीने सुरूव्हावी, अशी अपेक्षा शोध अहवालाचे काम करणारे ॲड. कैलास थोरात यांनी व्यक्त केली.
ई-सर्चची ही यंत्रणा दिवसभरात कधी तरी होते व शोध घेत असताना मध्येच ती बंद होते. त्यामुळे दस्तांचा शोध घेता येत नाही. तसेच नव्याने अपलोड करण्यात आलेल्या दस्तांमध्येही चुका आढळून येत आहेत. तर, काही इंडेक्स-2 (सूची- 2) मध्ये खरेदीदार अन्न विक्री करणारे यांची नावेदेखील चुकली असल्याचे निदर्शनास आले आहे.- ॲड. विलास जाधव