पुणे: पुण्यातील हवेली क्र. २० या दस्त नोंदणी कार्यालयातील सह दुय्यम निबंधकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २०) राज्यातील सर्व ५२३ कार्यालयाने बंद राहिली. परिणामी, सुमारे १० ते १२ हजार दस्तांची नोंदणी रखडल्याने राज्य सरकारचा सुमारे २०० कोटी रुपायंचा महसूल बुडाला. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी घेतल्याने राज्य सरकारला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली आहे.
यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुन्हेगार कुणीही असो, त्यांना शोधून योग्य ती शिक्षा देऊ, असे आश्वासन दिले आहे. महसूलमंत्र्यांबरोबर संघटेनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले. परिणामी, आज मंगळवारपासून (दि.२१) राज्यातील सर्व दस्तनोंदणी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत.
शहरातील हवेली क्र. २० मधील सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना काही वकील आणि पक्षकारांनी आपल्या सोयीनुसार दस्तनोंदणी न केल्याच्या रागातून मारहाण केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. याविरोधात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल केला.
त्यानंतर संतप्त संघटनांनी गुन्हेगारांना अटक होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार शनिवारी व रविवारी पुण्यासह मुंबईतील काही कार्यालये बंद ठेवली. मात्र, सोमवारी राज्यातील सर्वच ५२३ कार्यालये बंद ठेवली. त्याचा फटका दस्त नोंदणीली पर्यायाने सामान्यांना बसला. राज्यात दररोज सरासरी १० ते १२ हजार दस्तांची नोंदणी होते. त्यातून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला.
दरम्यान, या घटनेनंतर नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले.