पुणे: राष्ट्रवादी काँग््रेासने मावळ, इंदापूर बारामती आणि वेल्हे या तीन तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांचे नामोनिशाण मिटवले आहे, तर भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही; केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग््रेासला तर साधे खातेसुद्धा उघडता आले नाही. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही माजी सदस्य पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाहायला मिळणार आहेत.
भाजपचे आमदार राहुल कुल यांना दौंड तालुक्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सातपैकी केवळ एका जागेवर त्यांना यश मिळाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे हे तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग््रेासकडून निवडून आले असून, अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पुरंदरमध्ये माजी आमदार संजय जगताप यांनी निराशा केली. चारपैकी केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची कन्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे तसेच आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांच्या पत्नी रूपाली झेंडे या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
भोरमध्ये माजी आमदार संग््रााम थोपटे यांनी चारपैकी दोन जागा मिळवत बरोबरी साधली. त्यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. मात्र, वेल्हे तालुक्यात थोपटे यांना प्रभाव दाखवता आला नाही. या ठिकाणी भाजपने दोन्ही जागा गमावल्या. माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांना मावळमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषदेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीतही बाजी मारली. पाचही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार निवडून आले.
जुन्नरमध्ये शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे यांना आठपैकी केवळ तीन जागांवर विजय मिळवत समाधान मानावे लागले. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याचा फायदा जुन्नर तालुक्यात झाला. खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोबत घेत आठपैकी चार गटांमध्ये विजय मिळवत यश संपादन केले. आंबेगाव आणि शिरूर विधानसभा क्षेत्रात मागील वेळी एक वगळता सर्व जागा राष्ट्रवादी काँग््रेासकडे होत्या. यंदा टाकळी हाजी, रांजणगाव गणपती आणि कळंब या तीन जागा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गमावल्या. दोन्ही शिवसेना गटांना सोबत घेत शरद पवार गटाने जिल्ह्यातील एकमेव जागा प्रीती थोरात यांच्या रूपाने मिळवली. तसेच राष्ट्रवादी काँग््रेासमधून नाराज होऊन भाजपमध्ये गेलेले राजेंद्र गावंडे यांनी दणदणीत विजय मिळवला.
खेड तालुक्यात शिवसेना (उबाठा)चे आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. खेड पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 5 जागा त्यांनी जिंकल्या. शिरूर तालुक्यात भाजपने मुसंडी मारली. मागील निवडणुकीत खाते रिकामे असताना यावेळी भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा केवळ 57 मतांनी पराभव झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. येथे माजी सदस्य रेखा मंगलदास बांदल यांचाही पराभव झाला. माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या दुसऱ्यांदा निवडून आल्या. अपेक्षितप्रमाणे बारामतीत अजित पवार गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. इंदापूर तालुक्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आपले वर्चस्व अबाधित ठेवले. हवेली तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये चुरशीची लढत झाली. सहापैकी दोन जागांवर भाजपला यश मिळाले.
प्रमुख पराभूत उमेदवार
आशाताई बुचके, रणजित शिवतारे, रेखा बांदल, तुलसी भोर, बाबूराव वाईकर, चंद्रकांत बाठे, दत्ता झुरंगे, दत्ता गुंड, मालती बाबूराव पाचर्णे, स्नेहल शेळके, पांडुरंग पवार यांची सून, माऊली खंडागळे यांच्या पत्नी या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
प्रमुख विजयी उमेदवार
वीरधवल जगदाळे, सुनीता बुट्टे पाटील, सुवर्णा देविदास दरेकर, गुलाब पारखे, अमोल नलावडे, शांताराम इंगवले, स्वरूपा थोपटे, डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तुषार रमेश थोरात, विक्रम खुरवड, राजेंद्र पोपटराव गावडे, स्वाती पाचुंदकर, सुजाता पवार, विवेक वळसे पाटील, करण खलाटे.