पुणे: दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २६) दिली. त्यामुळे गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश असेल.
उच्च न्यायालयाने यापूर्वी शासनाला सादर केलेल्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत ही समिती अभ्यास करणार आहे. शासनाच्या अन्य विभागांतील समान संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसह राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराचाही विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागण्याची अपेक्षा असल्याची माहिती पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट 'क' संघटनेचे अध्यक्ष महेश आलमले आणि सचिव गोरक्षनाथ गोफणे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार शासनाने विचार करावा व लवकरात लवकर उच्च न्यायालयाने पाठवलेला प्रस्ताव जसाच्या तसा मजूर करण्यात यावा. मागण्या मजूर करण्यास शासनाने विलंब केल्यास पुन्हा संपावर जाणार इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.