पुणे: राज्याच्या सहकार आयुक्तालयांतर्गत विभागीय सहनिबंधक दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदावरील पदोन्नत्यांवर जवळपास शिक्कामोर्तब झालेले असून, लवकरच पदस्थापनेसह शासन आदेश जारी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधकपदासाठी अन्य अधिकाऱ्यांची यादीही प्रतीक्षेत असून, जिल्हा उपनिबंधकपदावरील पदभारासाठीही आता रस्सीखेच सुरू झाल्याचे सहकारच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. एकूणच, महत्त्वाच्या पोस्टिंगसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असून, पदोन्नत्यांसह हवे ते इच्छित पद मिळण्यासाठी मंत्रालयवारीही पूर्ण केल्याची चर्चा सुरू आहे.
अपर निबंधकपदी पदोन्नती होणार असलेल्या यादीमध्ये सहकारी संस्थांचे पुणे विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, पुण्यातील साखर आयुक्तालयातील साखर सहसंचालक (अर्थ) सचिन रावल, नागपूर विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव तसेच विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, पुण्यातील पणन संचालनालयातील सहसंचालक राजेंद्र दराडे, कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांचा समावेश आहे. तसेच, साखर संकुल येथील पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांचा समावेश आहे. या आठ विभागीय सहनिबंधकांच्या पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर जिल्हा उपनिबंधकांच्या बढत्यांचा प्रस्तावही मंत्रालयात असून, प्रत्यक्षात 30 पैकी किती अधिकाऱ्यांचा प्राधान्यक्रम येणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, अनेकांनी पदोन्नतीसह इच्छित पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी आपले राजकीय ’वजन’ही वापरल्याचे समजते. त्यामुळे कोणाची वर्णी कुठे लागणार? याची जोरदार चर्चा सध्या सहकार विभागात सुरू झाली आहे.
आठ विभागीय सहनिबंधकांना बढती मिळाल्यानंतर त्या पदावर पदोन्नतीने अथवा थेट येण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगण्यात येते. साखर आयुक्तालयातील संचालक (अर्थ) यशवंत गिरी हे बदलीपात्र आहेत. साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर व अविनाश देशमुख हे याच वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. यंदाच्या वर्षी पुणे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत (शहर) तसेच पुणे जिल्हा उपनिबंधक (ग््राामीण) प्रकाश जगताप हेसुध्दा बदलीपात्र आहेत. पुणे शहरमधील काही उपनिबंधकही बदलीपात्र आहेत.
या पदांसाठीही अनेकांची नावे चर्चेत आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांचे प्राधान्य हे पुण्यातच पद मिळण्यासाठी असल्याचीही चर्चा आहे. पणन संचालक आणि राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालकपद एकाच व्यक्तीकडे म्हणजे अपर निबंधक संजय कदम यांच्याकडे आहे. त्यामधील पणन संचालकपद मिळण्यासाठीही काही अधिकाऱ्यांकडून लॉबिंग सुरू केल्याचे समजते.
दरम्यान, पुणे बाजार समितीचे सचिव व उपनिबंधक राजाराम धोंडकर कार्यरत आहेत. हे पद अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी मंजूर आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटातील एका जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदाराचा केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे पद उपनिबंधकपदावरील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिले गेल्याची खदखद अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उघडपणे बोलून दाखविली जात आहे. त्यामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कधी न्याय देणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.