पुणे: राज्यातील लसीकरण कार्यक्रमांतर्गत बालकांच्या लसीकरणाचे 75 टक्के उद्दिष्ट डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली पोर्टलवरील आकडेवारीनुसार ही नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत जन्मापासून एक वर्षापर्यंतच्या बालकांना बीसीजी, ओपीव्ही, पेंटाव्हॅलेंट, हिपॅटायटिस बी, रोटाव्हायरस, एमआर आदी लसींचा समावेश होतो. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर आरोग्य यंत्रणेमार्फत नियमित तसेच विशेष लसीकरण मोहिमा राबविण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून डिसेंबरपर्यंत राज्याने 75 टक्के कामगिरी गाठली आहे.
दरम्यान, जानेवारी 2026 महिन्याचा लसीकरण अहवाल अद्याप अंतिम झालेला नाही. पोर्टलवरील जानेवारी महिन्याची माहिती संकलन व पडताळणी प्रक्रिया सुरू असून, 15 फेबुवारीनंतरच अंतिम आकडेवारी जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे राज्याची अंतिम लसीकरण कामगिरी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुढील काळात विशेष प्रयत्न केले जाणार
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पूर्ण लसीकरणामुळे बालमृत्यू दर कमी करण्यास तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होते. राज्याने उद्दिष्टपूर्ती केल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता अधोरेखित झाली असून, उर्वरित अपूर्ण लाभार्थींर्यंत पोहोचण्यासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात कोणत्या लसींचा समावेश?
जन्मावेळी दिली जाणारी बीसीजी (क्षयरोग) लस, हिपॅटायटिस-बी (जन्म डोस) आणि ओरल पोलिओ लस (जझत-0) कार्यक्रमाचा भाग आहे.
6, 10 व 14 आठवड्यांच्या वयात पेंटाव्हॅलेंट लस, ओपीव्ही, इनक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सीन तसेच रोटाव्हायरस लस दिली जाते.त्याच कालावधीत न्यूमोकॉकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन काही राज्यांमध्ये देण्यात येते.
9 ते 12 महिन्यांच्या वयात गोवर-रुबेला, जपानी मेंदूज्वर (निवडक जिल्ह्यांमध्ये) आणि व्हिटॅमिन-ए डोस दिला जातो.
16 ते 24 महिन्यांच्या वयात एमआर लसीचा दुसरा डोस, डीपीटी बूस्टर, ओपीव्ही बूस्टर आणि अतिरिक्त व्हिटॅमिन-ए डोसचा समावेश आहे.
5 ते 6 वर्षांच्या वयात डीपीटी बूस्टर, तर 10 व 16 वर्षांच्या वयात टीडी (टिटॅनस-डिफ्थेरिया) लस दिली जाते.