पुणे: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेल तर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा तसेच प्रवेश प्रक्रिया देखील लवकर व्हावी, या उद्देशाने पुढील वर्षाच्या प्रवेशाची सीईटी येत्या डिसेंबर महिन्यातच घेतली जाणार असल्याचे सीईटीसेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
सरदेसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा लवकर आयोजित करून या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीच्या प्रवेशाची सीईटी अधिक लवकर घेण्याचे नियोजन आहे.
डिसेंबर 15 ते जानेवारी 15 या कालावधीत पहिली सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे, तर दुसरी सीईटी मार्च- एप्रिलमध्ये घेणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे वर्षातून दोन वेळा सीईटी घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार यंदा दोन सीईटी घेण्यात आल्या. पहिली सीईटी झाल्यानंतर सध्या दुसऱ्या सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. पहिल्या सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, दुसऱ्या सीईटीचा निकाल 25 जूनपूर्वी प्रसिद्ध होईल.
बीएड, बीपीएड, एमपीएडसाठी आता एकच सीईटी
काही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा न घेता एकच सीईटी परीक्षा घेण्यात येईल. त्यानुसार बीएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांसाठी एकच सीईटी परीक्षा डिसेंबरपासून घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या वर्षांपासूनच सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात दोन नागपूरमध्ये दोन, मुंबई व परिसरात एकूण चार ते पाच विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू केले जातील. हे सर्व केंद्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतील. तसेच, त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करतील, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.