पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (इंटिग्रेटेड), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाच्या नोंदणीस २६ जुलै २०२६ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाच्या नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून, पहिली मुदतवाढ २० जुलै २०२६ पर्यंत दिली होती, तर आता दुसरी मुदतवाढ दिनांक २६ जुलै २०२६ पर्यंत दिली आहे.
या अभ्यासक्रमास आजपर्यंत बीबीए, बीएमएस, बीबीएम व एमबीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाला ३२ हजार ७६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाला २१ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही अभ्यासक्रम मिळून ५४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली ४४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
संबंधित अभ्यासक्रमांना आता पीसीएम तसेच पीसीबी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी' या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी, असे स्पष्ट केले आहे.
...असे आहे सुधारित वेळापत्रक
प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - ६ ते २६ जुलै
प्रवेशासाठीच्या अर्जाची पडताळणी व अर्जाची निश्चिती - ७ ते २७ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २९ जुलै
विद्यार्थ्यांच्या तक्रारी (असल्यास) सादर करणे- ३० जुलै ते १ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे- ३ ऑगस्ट