Digital Pudhari
पुणे

Maharashtra Board Digital Exam: दहावी-बारावी परीक्षा डिजिटल होणार! प्रश्नपत्रिका थेट केंद्रांवर, उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासणी

महाराष्ट्र राज्य मंडळाचा मोठा निर्णय; एआयचा वापर, परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक क्रांतीला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावी- बारावीच्या येत्या पुरवणी परीक्षेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ डिजटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यानुसार केवळ एका विषयाच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रावर पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकादेखील डिजीटल पद्धतीने तपासल्या जातील. यातील परिणामांचा अभ्यास करून फेबुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीने ऑफलाईन देण्यात येत होत्या. तसेच उत्तरपत्रिकादेखील ऑफलाईनच तपासल्या जात होत्या. परंतु, आता या प्रश्नपत्रिका डिजीटल पद्धतीने थेट केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठीची यंत्रणा राज्य मंडळाकडून विकसित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातील आणि ऑनस्क्रीन मार्किंगसाठी शिक्षकांकडे जातील तसेच यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‌‘एआय‌’ची देखील मदत घेता येईल का, याचीही प्रायोगिक स्तरावर चाचपणी केली जाणार आहे. सध्या अशा प्रकारचे प्रयोग काही प्रमाणात विविध विद्यापीठांमध्ये केले जात आहेत. परंतु राज्य मंडळाच्या स्तरावर अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येणार आहे.

परीक्षेच्या काळात अनेक शैक्षणिक संस्था इमारती देण्यासाठी नकार देतात, मनुष्यबळ मिळत नाही, वाहने मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे ज्या पद्धतीने निवडणुकांच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित गोष्टी ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. त्याच धर्तीवर परीक्षेच्या काळात राज्य मंडळाचे अध्यक्ष किंवा परीक्षा परिषदेला संबंधित अधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. संबंधित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एका ठराविक काळात परीक्षा पार पाडण्यासाठी आता कोणतीही अडचण राहणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तरपत्रिकेत छेडछाड केली तरीही होणार गुन्हा दाखल

याअगोदर दहावी- बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत काही गैरप्रकार झाल्यास त्याची तीवता पाहून थेट गुन्हे दाखल करण्यात येत होते. परंतु उत्तरपत्रिकांच्या बाबतीत अशी काही तरतूद नव्हती त्याचा गैरफायदा घेऊन उत्तरपत्रिका कोणाकडून तपासून घेणे, त्या कुठेही घेऊन जाणे असले प्रकार घडताना दिसत होते; परंतु यापुढे प्रश्नपत्रिकांएवढेच महत्त्व उत्तरपत्रिकांना देण्यात येणार असून, उत्तरपत्रिकांबरोबर छेडछाड केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव राज्य मंडळ शासनाला पाठवणार आहे.

अनावश्यक पेपर कमी करणार

दहावी-बारावीत असे काही विषय आहेत, ज्या विषयांना हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच विद्यार्थीसंख्या असते. परंतु यंत्रणा मात्र, सर्व कामाला लावावी लागते. त्यामुळे यासाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून आढावा घेतला जाणार असून, अनावश्यक पेपर कमी केले जातील, तर गणित, विज्ञान यांसारखे पेपर जे दोन भागांमध्ये घेतले जातात ते एकाच भागात घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT