पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावी परीक्षांदरम्यान दहावीमध्ये 72 गैरप्रकार आढळले, तर बारावीची परीक्षा देणाऱ्या 237 कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गैरप्रकार घटले असले तरी यंदा पहिल्यांदाच तब्बल 103 शिक्षकांना निलंबित केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात चालू असलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा 16 लाख 15 हजार 489 आणि बारावी परीक्षेत 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. बुधवारी (दि.18) दहावीचा सामाजिक शास्त्र तसेच भूगोल या विषयाने, तर बारावीच्या सामान्य ज्ञान या ऑनलाईन पेपरने परीक्षेचा शेवट झाल्याचे पाहायला मिळाले. दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली.
यंदा बारावीची परीक्षा राज्यातील 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी सुमारे 95 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते त्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली होती. तरीदेखील गैरप्रकारांना आळा घालण्यात राज्य मंडळाला अपयश आल्याचे दिसून आले आहे.