पुणे: राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आणि विद्युत ऑडिट करण्याचे आदेश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना दिले आहेत. तसेच येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासह येथे असणाऱ्या समस्यांचे लवकरच निराकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
येथील कृषी महाविद्यालयात बुधवारी (दि.25) त्यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा मेसमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही माहिती समजल्याने कृषिमंत्री भरणे यांनी शनिवारी (दि.28) सकाळी मुलांचे वसतिगृहातील अपघातस्थळी भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या ऐकून महाविद्यालयातील मेसचे कामकाज कसे चालते, याचीही माहिती जाणून घेतली. यावेळी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. महानंद माने हेसुध्दा उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना डॉ. माने म्हणाले, महाविद्यालयातील वसतिगृहाची ई इमारत ही फारच जुनी असून कोणीही राहत नाही. त्यामुळे इतर इमारतीमध्ये जादा विद्यार्थ्यांना राहावे लागते. त्यावेळी कृषी परिषदेने ठराव करुन मुलांसाठी वसतिगृहाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे. तो तातडीने त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही भरणे यांनी राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना दिल्या. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाच्या काळात मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली असता कोणालाही प्रवेश दिला जावू नये, असेही आदेश कृषिमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.