Export Pudhari
पुणे

Maharashtra Agriculture Exports: मध्य पूर्वेतील युद्धामुळे महाराष्ट्रातील कृषी निर्यात ठप्प, 50 कंटेनर पुण्यात परतले

इस्रायल-इराण संघर्षामुळे तळेगाव आणि दिघीमार्गे निर्यातीसाठी निघालेला कृषिमाल परत येऊन शेतकऱ्यांना कोट्यवधींचा आर्थिक फटका

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: गेल्या सतरा दिवसांपासून मध्य पूर्वेतील इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. पुणे कस्टम विभागातून निर्यातीसाठी निघालेला तब्बल 50 कंटेनर कृषिमाल युद्धामुळे पुन्हा पुणे विभागात परतला आहे. यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेती क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

पुणे जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर द्राक्षे, डाळिंब, कांदा, केळी आणि अन्य पालेभाज्यांची आखाती देशांत निर्यात केली जाते. मात्र, इस्रायल-इराण संघर्ष तीव्र झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग आणि हवाईवाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. पुणे विभागातील तळेगाव आणि दिघी या महत्त्वाच्या केंद्रांतून निघालेला सुमारे 50 कंटेनर माल युद्धामुळे आखाती देशांत पोहचू शकला नाही. हा माल नाशवंत असल्याने तो पुन्हा माघारी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

तळेगाव आणि दिघी केंद्रांचे महत्त्वाचे कामकाज

पुणे कस्टम विभागांतर्गत तळेगाव (आयडीसी) आणि दिघी ही दोन प्रमुख केंद्रे निर्यातीचा कणा आहेत. तळेगाव (इनलॅंड कंटेनर डेपो) येथे ‌‘ड्राई पोर्ट‌’ची सुविधा आहे. शेतातून आलेला माल येथे कंटेनरमध्ये भरला जातो, त्याची कस्टम विभागामार्फत तपासणी होते आणि त्याला सील ठोकले जाते. तसेच, दिघी येथे मालाची गुणवत्ता तपासणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाते. या दोन्ही केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मुंबईला न जाता पुण्यातूनच निर्यातीची परवानगी मिळते.

पुणे कस्टम विभागाची व्याप्ती...

पुणे कस्टम आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र फक्त पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पट्‌‍ट्याचा यात समावेश होतो. पुणे कस्टम आयुक्तालयाचे कामकाज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाचही जिल्ह्यांत चालते. येथील शेतकऱ्यांचा माल तळेगाव आणि दिघीमार्गे जगाच्या बाजारात जात असतो. मात्र, सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे या संपूर्ण पट्‌‍ट्यातील निर्यातदारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ड्राय पोर्ट म्हणजे काय?

ड्राय पोर्ट म्हणजे बंदरापासून दूर, जमिनीवर असलेले एक विशेष पोर्ट (केंद्र). जे रेल्वे किंवा रस्त्याने मुख्य बंदराशी जोडलेले असते. हे ठिकाण मालवाहतुकीसाठी कंटेनर साठवणे, सीमाशुल्क (कस्टम) तपासणी आणि पॅकिंगची सुविधा देते, त्यामुळे मालाची आयात-निर्यात प्रक्रिया सोपी आणि वेगवान होते. हे केंद्र समुद्राजवळ नसून शहराच्या किंवा औद्योगिक क्षेत्राजवळ जमिनीवर असते. येथे मालाचे कस्टम क्लीअरन्स (तपासणी) होते. त्यामुळे मुख्य बंदरावर गर्दी कमी होते. रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमातून हे केंद्र थेट मुख्य सागरी बंदराशी जोडलेले असते. माल साठविण्यासाठी आणि कंटेनर एकत्रीकरणासाठी येथे जागा असते.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. पुणे विभागातून निर्यातीसाठी निघालेले 50 कंटेनर फक्त युद्धामुळे आखाती देशांत पोहचू शकले नाहीत आणि ते पुन्हा परत आले आहेत. कृषिमाल हा नाशवंत असतो, त्यामुळे अशा विलंबामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
अनिल डी. प्रधान आयुक्त, सीमा शुल्क (कस्टम), पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT