Agriculture Admission 2026 Pudhari
पुणे

Agriculture Admission 2026: कृषी विद्यापीठांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आजपासून

नऊ विद्या शाखांमधील व्यावसायिक पदवीसाठी १९५ महाविद्यालये

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील नऊ विद्या शाखांमध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (दि.१०) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणात सुरू होत आहे.

पदवी अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा असून, १९५ महाविद्यालयांत प्रथम वर्षाची प्रवेशक्षमता १७ हजार ५८६ आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक किशोर शिंदे यांनी दिली.

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने ४५ महाविद्यालये शासकीय, दोन अनुदानित आणि १४८ महाविद्यालये कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावरील आहेत. यात बी.एस्सी (ऑनर्स), बी.एस्सी. (ऑनर्स-उद्यानविद्या), बी.एस्सी. (ऑनर्स-वनविद्या), बी.टेक (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक (अन्न तंत्रज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स-सामाजिक विज्ञान), बी.टेक (जैवतंत्रज्ञान) आणि बी.एफ.एस्सी. (मत्स्यशास्त्र), बी.एस्सी. (ऑनर्स-कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत ७७, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत ३८, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ५७ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत २३ अशी विद्यापीठनिहाय महाविद्यालये कार्यरत आहेत.

कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयात २० टक्‍के जागा संस्थास्तरीय कोट्याकरिता राखीव ठेवून उर्वरित जागांपैकी ३० टक्‍के महाराष्ट्र कोटा आणि ७० टक्‍के कृषी विद्यापीठ कोटा असे जागांचे वाटप असेल. इयत्ता १२ वी विज्ञान आणि एमएसटी-सीईटी/जी/नीट या सामायिक प्रवेश परीक्षेत उमेदवाराने घेतलेल्या गटानुसार (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित) उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे.

इयत्ता १२ वी विज्ञानमध्ये संवैधानिक आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ४० टक्‍के गुण आणि खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्‍के गुण अनिवार्य आहेत.

या संकेतस्थळावर करा नोंदणी

प्रवेशोच्छुक उमेदवाराने https://etcell.mahacet.orgap-2026-27/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच याच संकेतस्थळावर कृषी विद्यापीठांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी विविध महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम (विकल्प) व इतर माहिती भरावयाची आहे.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेश माहिती पुस्तिका www.mahacet.org/ www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांनी विचारपूर्वक जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT