

Dhankawadi Massive Fire Incident
पुणे : "घरात चूल पेटवू नका," अशी शेजाऱ्यांची वारंवार विनंती... सोसायटीची समजूत... तरीही सवय काही सुटली नाही. अखेर याच हट्टाने एका रिक्षाचालकासह संपूर्ण इमारतीतील कुटुंबांचा जीव धोक्यात आला. धनकवडीतील राज टॉवरमध्ये घरात चूल पेटविताना पेट्रोलचा वापर केल्याने भीषण आग लागली आणि काही क्षणांतच आगीने वरच्या दोन फ्लॅटनाही विळखा घातला.
या घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी सुहास बबन गायकवाड (वय ४८) याला अटक केली आहे. याप्रकरणी हेमा किरण गुजर (वय ४७) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास गायकवाड हा व्यवसायाने रिक्षाचालक असून तो राज टॉवरमधील फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. त्याचे आई-वडील हयात नसून त्याच्या दोन बहिणी सदाशिव पेठेत राहतात.
गेल्या काही दिवसांपासून तो घरामध्येच लाकडाची चूल पेटवून स्वयंपाक करीत होता. सोसायटीतील रहिवाशांनी अनेकदा त्याला असे करू नको, आग लागण्याचा धोका आहे, अशी समज दिली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी (दि. ८) सकाळी नेहमीप्रमाणे त्याने घरात चूल पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाचे वातावरण असल्याने व ओल्या लाकडामुळे चूल पेटत नसल्याने त्याने त्यावर अधिक प्रमाणात पेट्रोल ओतले.
क्षणार्धात पेट्रोलचा मोठा भडका उडाला आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची तीव्रता इतकी होती की, तिच्या झळा वरच्या दोन फ्लॅटपर्यंत पोहोचल्या. रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली, तर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत सुमारे चार लाख सत्तर हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.
या निष्काळजीपणामुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने सहकारनगर पोलिसांनी सुहास गायकवाड याला अटक केली. त्याला न्यायालयातही हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.