School Pudhari
पुणे

Maharashtra Unauthorized Schools: महाराष्ट्रात ५२६ अनधिकृत शाळा; पुणे विभागात ५३, मुंबईत सर्वाधिक ४५२

मान्यता नसतानाही शिक्षण सुरू; ४३ शाळा बंद, १५५ शाळांवर एफआयआर, ४२२ शाळांवर नोटीस किंवा दंडाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात तब्बल ५२६ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी सर्वाधिक ४५२ शाळा मुंबई विभागात आहेत. तर, पुणे विभागात ५३ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत.

शासनाची मान्यता आणि यू-डायस क्रमांक घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून या शाळा चालविल्या जात असल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

राज्यातील अनधिकृत शाळांपैकी ४३ शाळा बंद केल्या असून, १५५ शाळांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच, ४२२ शाळांना नोटीस बजावली किंवा दंडाची कारवाई केली आहे. मुंबई विभागातील ४५२ अनधिकृत शाळांपैकी २३ शाळा बंद केल्या, तर १४९ शाळांवर एफआयआर दाखल झाला आहे. ३९६ शाळांवर नोटीस किंवा दंडाची कारवाई झाली आहे.

पुणे विभागात ५३ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्यापैकी १४ शाळा बंद केल्या आणि नऊ शाळांवर एफआयआर दाखल केला आहे. नागपूर विभागात ११ अनधिकृत शाळांची नोंद आहे. त्यापैकी पाच शाळा बंद केल्या असून चार शाळांवर एफआयआर दाखल झाला आहे. नाशिक विभागात चार, अमरावतीत दोन आणि संभाजीनगर विभागात चार अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. कोल्हापूर आणि लातूर विभागात मात्र एकही अनधिकृत शाळा नोंदलेली नाही.

अनधिकृत शाळांबाबत कठोर पावले उचला

मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिक्षण सुरूच असल्याने शिक्षण विभागाच्या कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या भविष्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रकरणात अधिक कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT