महाळुंगे पडवळ-बारवेवस्ती रस्ता दहा वर्षे रखडला; प्रवासी व रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा  Pudhari
पुणे

Road Issue: महाळुंगे पडवळ-बारवेवस्ती रस्ता दहा वर्षे रखडला; प्रवासी व रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उशीर

पुढारी वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील बारवेवस्ती-देसावळाकडे जाणारा रस्ता मागील दहा वर्षांपासून रखडला असल्याने येथील प्रवासी, रहिवासी तसेच शाळकरी मुले त्रस्त झाली आहेत. हा रस्ता त्वरित करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा हुतात्मा बाबू गेनू युवा संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर व महिला तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.

कानसे-चास-महाळुंगे पडवळ-गुंजाळवाडी-नारायणगाव हा जिल्हा मार्ग आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या रस्त्यावर सुमारे 1 कोटी 68 लक्ष रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी मजबुतीकरण तसेच डांबरीकरणाचे काम सन 2020 मध्ये पूर्ण केले; मात्र, महाळुंगे पडवळ-सैदवाडी-बारवेवस्ती ते देसावळा या भागातील सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांच्या अडथळ्यामुळे सुमारे 10 वर्ष रखडले आहे. (Latest Pune News)

या भागातील रहिवाशांनी ग्रामपंचायत महाळुंगे पडवळ, पंचायत समिती घोडेगाव, जिल्हा परिषद बांधकाम विभाग पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय मंचर, पोलिस ठाणे मंचर यांच्याकडे मागील पाच वर्षापासून सातत्याने तक्रारी केल्या आहेत. रखडलेल्या एक किलोमीटर रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावर दुचाकीस्वाराला गाडीदेखील चालवता येत नाही. शाळकरी मुलांच्या पायाला खड्ड्यामुळे इजा झाल्या आहेत. सायकल व इतर वाहनांचे अनेक वेळा अपघात झाले आहेत. वारंवार मागणी करून देखील रस्त्याचे काम होत नसल्याने येथील महिला, नागरिक आणि प्रवासी आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत. याबाबतचे निवेदन मंचर येथील प्रांत अधिकारी यांना देण्यात आले, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिली

महाळुंगे पडवळ येथील शेतकरी न्यायालयात गेल्याने या रस्त्याचे काम केले अनेक वर्ष रखडले आहे. मंचर येथील उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत रस्त्याची पाहणी करून त्वरित निर्णय घ्यावा.
- बाबाजी चासकर, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेणू युवा प्रतिष्ठान
शेतकरी न्यायालयात गेल्याने ही बाब न्यायप्रविष्ट झाली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.
- सम्राट, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT