Mahajyoti Exam Cancelled Pudhari
पुणे

Mahajyoti Exam: परीक्षा द्यायला पोहोचल्या, पण संगणकच नव्हते! महाज्योतीच्या परीक्षेचा मोठा गोंधळ; अखेर परीक्षा रद्द

Mahajyoti Exam Cancelled: महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान पुण्यातील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला.

Rahul Shelke

Mahajyoti Exam Cancelled: महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आज मोठा गोंधळ निर्माण झाला. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थीनी सकाळीच केंद्रावर पोहोचल्या होत्या. मात्र, परीक्षा केंद्रावर संगणकाची व्यवस्था उपलब्ध नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. त्यामुळे नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही परीक्षा सुरू झाली नाही. अखेर संबंधित केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील सण ब्राईट स्कूल हे महाज्योती परीक्षेचे केंद्र होते. सकाळी 9 ते 11 या वेळेत परीक्षा घेण्यात येणार होती. त्यासाठी अनेक विद्यार्थीनी वेळेपूर्वीच केंद्रावर दाखल झाल्या. मात्र, परीक्षा सुरू होण्याची वेळ झाली तरी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आली नाही.

विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक असलेले संगणक केंद्रावर उपलब्ध नव्हते. त्यामुळे परीक्षा कशी घेणार, असा प्रश्न विद्यार्थिनींसमोर निर्माण झाला. बराच वेळ उलटूनही ठोस माहिती मिळत नसल्याने केंद्राबाहेर विद्यार्थिनींची गर्दी झाली.

बराच वेळ विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर

परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी निर्माण झाली. सकाळपासून त्या परीक्षा केंद्राबाहेर थांबल्या होत्या. परीक्षा कधी सुरू होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

केंद्रावरील व्यवस्थापनाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने विद्यार्थिनींचा संताप वाढला. अखेर संबंधित अधिकाऱ्यांकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तयारी करून आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परतावे लागले.

या प्रकारामुळे महाज्योतीच्या परीक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षा केंद्र निवडताना आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देताना पुरेशी तयारी करण्यात आली होती का, असा सवाल आता केला जात आहे.

रोहित पवारांचा संताप

या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाज्योतीच्या कारभारावरून त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे संकेत दिले. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर बोलावूनही योग्य व्यवस्था करण्यात आली नसेल, तर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याबाबत विद्यार्थ्यांना अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT