CET Pudhari
पुणे

CET 2026 Admit Card: सीईटी 2026 प्रवेश परीक्षांसाठी दोन प्रवेशपत्रांची नवी पद्धत

अस्थायी आणि अंतिम प्रवेशपत्रांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची पूर्वकल्पना मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर 17 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 24 मार्च ते 16 मेदरम्यान घेण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेचे एक अस्थायी आणि एक अंतिम अशी दोन प्रवेशपत्रे देणार आहे.

सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षांचे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यानंतर त्या त्या प्रवेश परीक्षेच्या 8 ते 10 दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध होतील. या अस्थायी प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठी कोणता जिल्हा व कोणते शहर आले आहे हे समजू शकेल.

विद्यार्थी परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार त्याला चार जिल्हे भरावे लागतात. त्यानुसार या अस्थायी प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात व कोणत्या जिल्ह्यात आहे, यासंबंधीची माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात प्रत्यक्ष परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचा कोड, परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता याची माहिती दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अंतिम प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.

एमपीएड, एमएड व एमएचएमसीटीची प्रवेशपत्रे उपलब्ध

सध्या एमपीएड, एमएड व एमएचएमसीटी या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यातील एमपीएड या अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवार (दि. 24 मार्च) पासून सुरू होत आहे. या परीक्षेला यावर्षी 2 हजार 525 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत, तर एमएड या अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवार (दि. 25 मार्च) पासून सुरू होत आहे.

या प्रवेश परीक्षेला यावर्षी 3985 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत, तर एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवार दिनांक 25 मार्चपासून सुरू होत आहे. या प्रवेश परीक्षेला यावर्षी 55 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग-इनमधून डाउनलोड करून घ्यावीत, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT