Madanwadi lake water crisis Pudhari
पुणे

Madanwadi lake water crisis: मदनवाडी तलावातील साठा खालावला; शेतकऱ्यांची चिंता वाढली

महिनाभराचा साठा शिल्लक?

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: सन 1952 मध्ये निर्मिती झालेल्या मदनवाडी तलावात आधीच गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे. दुसऱ्या बाजूने तलावाला अतिक्रमणाचा विळखा पडल्याने पाणी साठवणक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यातच आता तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.

पिण्याचे पाणी व शेतीसिंचनाला मदनवाडी तलाव हा परिसराला वरदान ठरला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या 1 ते 3 तारखेला प्रचंड अतिवृष्टी होऊन तलाव पूर्णक्षमतेने भरला होता. परंतु, या तलावावर बेकायदा उपचा सिंचन वाढल्याने पाण्याचा बेफाम उपसा सुरू आहे.

पूर्वी या तलावाला खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळायचे; मात्र अलिकडे ते बंद झाले आहे. त्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावरच याचे भविष्य उभे आहे. या तलावावर मदनवाडी तसेच निंबोडी, शेटफळगढे, पिंपळे अगदी स्वामी चिंचोलीपर्यंतची शेती ओलिताखाली येते. विविध कारणांनी पाणी साठवणक्षमता कमी व उपशाचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याने 170 हेक्टर जलक्षेत्र असूनही एप्रिल व मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागते. अगदी महिना-दोन महिन्यांसाठी उभी पिके जळण्याचा धोका वाढतो.

सध्या या तलावातील पाणीसाठा खालावला असून, अंदाजे महिनाभर टिकेल एवढा साठा उपलब्ध आहे. या तलावातील वाढलेल्या गाळाचे प्रमाण लक्ष्यात घेऊन भारत फोर्ज, बारामती ॲग््राो, रोटरी क्लबच्या वतीने काही प्रमाणात गाळ काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र तलावाची क्षमता लक्षात घेता तो तोकडा पडला आहे. त्यामुळे तलावातील गाळ काढून वाढलेली अतिक्रमणे काढली तरी तलावतील पाणीसाठा वर्षाभर टिकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लढणारी पिढी गेली, काही थकली; पण...

इंदापूर तालुक्यातील तलावांना पूर्वी खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळत असल्याने बळीराजाला पाणीटंचाई जाणवत नव्हती. परंतु, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हे आवर्तन बंद करण्यात आले. तेव्हापासून या भागातील शेतकरी संघटनेचे नेते गुलाबराव कन्हेरकर यांच्यासह अनेक जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी लढा दिला. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यादरम्यान कन्हेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, पाटबंधारे विभागाच्या खप्पामर्जीमुळे त्यांचे सर्वांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT