पुणे; पुढारी वृत्तसेवा : टेरोटेरीयल आर्मीत (सैन्यदल) भरती करण्याच्या नावाने 42 मुलांना 1 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सांगली परिसरातील मुले फसली गेली आहेत. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला.
याबाबत महेश पंढरीनाथ ढाके (35,रा. पाटण, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात पांडुरंग कराळे (वय 45, रा. स्टेशन रोड, गजानननगर, पाटीलमळा, तासगाव, सांगली) याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढाके हे शेतकरी आहेत. ते पुण्यात हडपसर येथे एका दवाखान्यात कामानिमित्त आले होते. काम संपवून घरी जाताना कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबले होते. तेव्हा शेजारील टेबलवर लष्कर भरतीसंदर्भात चर्चा सुरू होती.
ढाके यांनी त्यांना विचारले असता, आरोपी कराळेनी माझे लष्करातील मोठ्या अधिकार्यांशी संबंध आहेत. मी टेरोटोरीयल आर्मीत नोकरी मिळवून देतो. तुमचे नातेवाईक आणि मित्र असतील तर मला सांगा. यानंतर ढाके गावाला परतल्यावर दर दोन दिवसांनी कराळे फोन करून विचारणा करत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून ढाके यांनी मित्राचा मुलगा आणि इतरांकडून पैसे गोळा केले. एका उमेदवारासाठी सहा लाख रुपये दर कराळेने सांगितला होता. त्यानुसार ढाके यांनी गावातून आणि परिचित व्यक्तींकडून 1 कोटी 80 लाख रुपये गोळा करून कराळेला दिले.
कराळेने 20 मुलांची बेळगाव येथे बोगस वैद्यकीय तपासणी केली. तसेच हॉल तिकीटही बोगस पाठवले. त्यांची ओरिजनल मार्कलिस्ट आणि कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेतली. लेखी परीक्षेची तारीख कळविण्यात येईल, असे तो वारंवार सांगत होता. यानंतर मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने ढाके यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उसगावकर करत आहेत.
सैन्यदलातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढाके यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पांडुरंग कराळे याला अटक केली आहे. त्याने आतापर्यंत 42 मुलांना 1 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा