पुणे: फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकार हे दोन्ही गंभीर आजार मानले जातात. दोन्ही आजारांमध्ये केवळ धूम्रपान, वायुप्रदूषण यांसारखे सामान्य जोखीम घटक समान नाहीत, तर त्यांच्यातील जैविक आणि पेशींवर होणारे परिणामदेखील एकमेकांवर प्रभाव टाकतात, असे अलीकडील वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम, आहार, स्वच्छ हवा आदी घटक महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
दर वर्षी 31 जुलै हा दिवस फुफ्फुस कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘मुक्त श्वास, वेळेत निदान’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. तंबाखूसेवन, प्रदूषण आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयी यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो आणि याच तणावातून हृदयाचे कार्यही बिघडू शकते. भारतात दर वर्षी सुमारे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 70,000 नवे रुग्ण आढळतात. (Latest Pune News)
त्यापैकी 25 ते 30 टक्के रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित गुंतागुंत आढळते. आयसीएमआर आणि एम्स या संस्थांनी 2023 पासून भारतात ‘फुफ्फुस कर्करोग आणि हृदयरोग याबाबतची नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये दोन्ही आजारांच्या परस्परसंबंधांची तपशीलवार माहिती संकलित केली जात आहे.
फुफ्फुसांची कार्यक्षमता कशी वाढवावी?
नियमित व्यायाम : तुम्ही व्यायाम करता, तेव्हा फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजनची गरज असते, ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम होतात. चालणे, जॉगिंग, धावणे, पोहणे, सायकल चालवणे फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी उत्तम आहेत. योगाभ्यासामधील प्राणायाम आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत करतात.
धूम्रपान टाळा : धूम्रपान फुफ्फुसांसाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात. धूम्रपान सोडल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता कालांतराने सुधारते.
स्वच्छ हवेत राहा : प्रदूषित हवा फुफ्फुसांना नुकसान पोचवू शकते. शक्य असल्यास जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. घरात हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करू शकता. घरातील झाडे हवा शुद्ध करण्यास मदत करतात.
योग्य आहार : संतुलित आणि पौष्टिक आहार फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. फळे, भाज्या आणि बेरी यात असलेले अँटिऑक्सिडंट्स फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून वाचवतात. मासे, अक्रोड आणि जवसाच्या बिया यामध्ये असलेले ओमेगा-3 फुफ्फुसांची सूज कमी करण्यास मदत करतात. पुरेसे पाणी प्यायल्याने फुफ्फुसांमध्ये असलेला कफ पातळ होण्यास मदत होते.
संसर्ग टाळा : सर्दी, फ्लू किंवा न्यूमोनियासारखे श्वसनाचे संसर्ग फुफ्फुसांना कमजोर करू शकतात. वेळेवर लसीकरण करून घ्या. हात वारंवार धुवा. संसर्ग झालेल्या लोकांपासून अंतर ठेवा. - डॉ. महावीर मोदी, फुफ्फुसरोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक
फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकार यांमधील संबंध गुंतागुंतीचा असून अनेकदा दुर्लक्षित होतो, पण तो अतिशय महत्त्वाचा आहे. या दोन्ही आजारांचे धूम—पान, प्रदूषण, दीर्घकालीन जळजळ, वयोमान आणि स्थूल जीवनशैली हे सामान्य जोखमीचे घटक आहेत. त्यामुळे एक आजार झालेल्या व्यक्तींना दुसर्या आजाराचा धोका अधिक असतो. ही दोन्ही स्थिती एकमेकांवर परिणाम करत असल्यामुळे ‘कार्डिओ-ऑन्कोलॉजी’ या नव्या वैद्यकीय क्षेत्राचा उदय झाला आहे. फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकार हे दोन्ही आजार जागतिक स्तरावर मृत्यूचे महत्त्वाचे कारण आहेत. त्यामुळे उपचाराच्या वेळी आणि नंतर नियमित हृदयविकार चाचण्या करून, धोका ओळखून योग्य हस्तक्षेप करणे हे गरजेचे आहे. हृदय आणि फुफ्फुस यांमधील परस्परसंबंध ओळखणे म्हणजे एकूणच आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे.- डॉ. अभिजित खडतरे, कार्डिओलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक, पुणे.