

प्रसाद जगताप
पुणे: रेल्वेच्या पुणे विभागात आता 13 ठिकाणी नवीन गुड्स शेड्स उभे करण्यात येत आहेत. या नव्या गुड्स शेड्समुळे रेल्वेच्या पुणे विभागातून होणार्या पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाईल, साखरेसह अन्य काही वस्तूंच्या वाहतुकीला मोठा हातभार लागणार आहे. विभागातील मालवाहतुकीचा वेग वाढणार असून, मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
प्रवासी तिकीट महसुलासह मालवाहतुकीतूनही रेल्वेला मोठा महसूल मिळतो. यासाठी रेल्वेकडून स्वतंत्र मालगाड्यांचे नियोजन केले आहे. या मालगाड्यांमध्ये मालाची चढ-उतार वेगवान व्हावी आणि जास्तीत जास्त मालवाहतूक होऊन रेल्वेला अधिकचे उत्पन्न मिळावे, याकरिता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 13 ठिकाणी नवीन गुड्स शेड्स बनवण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे नक्कीच पुणे विभागातील वाहतुकीला चालना मिळणार आहे, असा विश्वास रेल्वे अधिकार्यांनी व्यक्त केला. (Latest Pune News)
... अशी झाली रेल्वे पुणे विभागात मालवाहतूक (आर्थिक वर्ष 2024-25)
प्रवासी महसूल 1466.82 कोटी रुपये (गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 20.9 टक्के वाढ)
मालवाहतूक महसूल 540.47 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 20.7 टक्के वाढ)
इतर कोचिंग महसूल 129.05 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 8.4 टक्के)
विविध महसूल 22.61 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9.9 टक्के वाढ)
मूळ प्रवासी वाहतूक 65.72 दशलक्ष (गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17.6 टक्के वाढ)
पार्सल महसूल 36.24 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22.4 टक्के वाढ)
व्यावसायिक प्रसिद्धी महसूल 14.19 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 8.3 टक्के वाढ)
पे अँड पार्क कराराचा महसूल 3.0 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9.5 टक्के वाढ)
खानपान कंत्राट महसूल 3.14 कोटी रुपये (गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 25.3 टक्के वाढ)
एकूण महसूल 2158.95 कोटी रुपये (गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19.9 टक्के वाढ)
पुणे विभागातील मालवाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आणि मालवाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागाकडून नवीन गुड्स शेड उभारण्याचे काम सुरू आहे. या गुड्स शेड्समुळे पुणे विभागातील वाहतुकीला आणखी गती मिळणार आहे.
- हेमंतकुमार बेहराम, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग