संतोष वळसे पाटील
मंचर: दीड वर्षांपूर्वी जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी झाली होती. त्यावेळी लम्पीमुळे आजारी पडलेली जनावरे पशुवैद्यकीय यांच्या उपचारांमुळे सावरली. त्यासाठी महागडी औषधे शेतकर्यांना विकत आणावी लागली.
आता पुन्हा लम्पी आजाराने जनावरे आजारी पडल्याने शेतकर्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने मोफत औषधे देऊन पशुमालकांना मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. (Latest Pune News)
गावठी बैलांना हा आजार जास्त प्रमाणावर होत असून याचा सर्वाधिक फटका बैलगाडा शर्यतीच्या बैलांना देखील होत आहे. सध्या बैलगाड्याच्या शर्यती लम्पी आजारामुळे बंद केल्या आहेत; मात्र, हा आजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याचा फटका बैलगाडामालकांना बसत आहे. त्याचप्रमाणे जर्सी गायींच्या कालवडींनाही लम्पी आजार होत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरीही या आजाराला वैतागला आहे.
सध्या जर्सी गायींच्या दुधाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे आधीच दूध उत्पादनामुळे अडचणीत आलेला गोपालक लम्पीने दुहेरी संकटात सापडला आहे. सध्या दुधाचे दर हे 30 ते 31 रुपये प्रतिलिटर असे आहेत. दुसरीकडे चारा, रतीब, डॉक्टर, मजुरी या सर्व गोष्टींचा विचार करता दूध उत्पादन करणे परवडत नाही. त्यातच जे शेतकरी दूध उत्पादन करतात, त्यांनाही लम्पीच्या आजारामुळे मोठा आर्थिक तोटा होत आहे.
नुकसानभरपाई द्यावी
आता अनेक ठिकाणी जर्सी कालवडी दगावल्याचेही पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच शासनाने लम्पी आजारावर ताबडतोब उपाययोजना केली पाहिजे. तसेच लम्पीमुळे जनावरे दगावलीत, त्या शेतकर्यांनाही नुकसानभरपाई दिली पाहिजे. लम्पीग्रस्त जनावरांना मोफत औषधोपचार शासनाच्या वतीने करावे, अशी मागणी काठापूर येथील दूध उत्पादक शेतकरी नितीन ढोबळे यांनी केले आहे.
अशी करावी उपाययोजना
नियमित लसीकरण करून घ्या.
चराईसाठी स्वच्छ जागा निवडा.
पाण्याच्या जागा स्वच्छ ठेवा.
माशा-डास नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करा.
संशयित जनावरांची माहिती पशुवैद्यकांना तत्काळ द्या.
लम्पी आजारावरील विशेष लस उपलब्ध आहे. संक्रमित जनावरांना वेगळे ठेवणे, माशा-डास नियंत्रण, साफसफाई व स्वच्छता राखावी. तसेच जनावरांना असलेल्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात जंतुसंसर्ग रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स दिली जातात. तसेच ताप उतरवणारे व वेदनाशामक औषधे देण्यासह इतरही उपचार केले जातात.- डॉ. अजय कोल्हे, पशुवैद्यकीय अधिकारी, वडगाव काशिंबेग