पारगाव: वळती (ता. आंबेगाव) येथे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
वळती गावातील नागरिकांची सन 2015-16 पासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मागणी होती. वळती गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्याचे भूमिपूजन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. (Latest Pune News)
याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, शरद बँकेच्या संचालिका सुषमाताई शिंदे, शिवाजीराव लोंढे, किसनराव लोखंडे, उद्योजक मनोहर शेळके, बारकू बेनके, रमेश खिलारी, अजय आवटे, पोपट थिटे, सरपंच आनंद वाव्हळ, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, गटशिक्षणाधिकारी प्रमिला धोका आदींसह वळती-गांजवेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, वळती गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत देवराम दामाजी भोर यांच्या पासून हे गाव नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ठाम उभे राहिले आहे. गावाने सुरुवातीला माजी आमदार स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांना साथ दिली.
त्यानंतर गेली 35 वर्षे वळती गाव माझ्यापाठी खंबीरपणे उभे आहे. आम्ही कधीही राजकारण केले नाही. सात वेळा जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिले. अनेक मंत्रिपदांवर मी काम केले. विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनदेखील काम केले. मिळालेल्या पदांचा सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविक शिवाजीराव लोंढे यांनी केले. या वेळी सरपंच आनंद वाव्हळ, रमेश खिलारी, वैभव उंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल वाजे यांनी केले. आभार बारकू बेनके यांनी मानले.
बंधार्याच्या दुरुस्तीची मागणी
वळती ते नागापूर गावांदरम्यान असलेल्या मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे ढापे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे बंधार्यात पाणी साठून राहत नाही. अल्पावधीतच बंधारा कोरडा ठाक पडतो. या बंधार्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी शिवाजीराव लोंढे यांनी केली. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना बंधार्याची पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सांगितले.