पुणे: पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे शिल्लक असलेले व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, तसेच हॉटेल्सना पुरवण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
वास्तवात आखाती युद्धामुळे गॅस कंपन्यांकडून एजन्सींना होणारा गॅसपुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यामुळे एजन्सीजमध्ये सिलिंडर उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत शिल्लक सिलिंडर कसे मिळणार आणि गॅसपुरवठा कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्न व पुरवठा खात्याच्या वतीने 13 मार्च रोजी काढलेल्या पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्णालये, शाळा, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथालयांना 100 टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. उपाहारगृह, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे यांना 70 टक्के, तर औषध, उद्योग आणि मत्स्यपालन विभागाला 50 टक्के शिल्लक गॅस उपलब्ध करावा, अशी सूचना आहे.
पुणे जिल्ह्यात किती व्यावसायिक गॅस सिलिंडर शिल्लक आहेत का, याची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, व्यावसायिक गॅसचा तुटवडा विशेषत: हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रुग्णालयांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण करीत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले, की गरजेनुसार गॅस न मिळाल्याने ग््रााहकांना सेवा देणे कठीण झाले आहे.
या परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार, गॅस एजन्सींनी प्राधान्यक्रम ठरवून रुग्णालये, शाळा, वृद्धाश्रम आणि हॉटेल्ससह महत्त्वाच्या संस्थांना शिल्लक गॅस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, गॅस कंपन्यांनी पुरवठा थांबविल्यामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार, हे पाहावे लागणार आहे.