डीपी (विद्यूत रोहीत्र) चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना लोणीकंद पोलिसांनी सहा महिन्यापुर्वी झालेल्या खूनाचा उलघडा करत आरोपीला अटक केली आहे. दिनेश कुंदन पवार (वय.25,रा. गणपती माळ तळेगाव ढमढरे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी पवार याचा डिपी चोरीमधील साथीदार व चोरीचा मुद्देमाल घेणारी व्यक्ती अशा दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. (लोणीकंद पोलिस)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी आरोपी पवार याने त्याच्या चार साथीदारांसोबत शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमदाडे मळा पिंपळवाडी रोड पाबळ वस्ती येथील तुळसाबाई पर्वती जाधव यांच्या घरी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकला. जाधव यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. यावेळी जाधव यांची मुलगी शकुंतला प्रकाश शिंदे ( वय 50) हिच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला असता, आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. शकुंतला ही माहेरी आईकडे आली होती. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दरोडा व खूनाचा गुन्हा दाखल आहे. पाच महिन्यापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. (लोणीकंद पोलिस)
दरम्यान लोणीकंद पोलिस ठाण्याचे तपास पथक डीपी चोरीच्या अनुषंगाने तपास करीत होते. त्यावेळी पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे यांना बातमी मिळाली होती की, पेरणे डोंगरगाव रोडवर दोन व्यक्ती डीपीच्या जवळ संशयास्पदरित्या फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांना तेथून शिवा नाना जगताप (वय.40, रा. केडगाव मार्केटच्या पाठीमागे दौंड) व दिनेश पवार या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
दोघांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी येथील परिसरातून पाच डीपी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी चोरीचा माल घेणारा व्यक्ती विरम दीपाराम चौधरी (वय.50, रा.शिक्रापुर तळेगाव रोड, शिक्रापुर) याला देखील अटक करण्यात आली.
दिनेश पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना तो काही तरी लपवून ठेवत असल्याचा संशय पोलिसांना आला. अनेकदा चौकशी करून देखील तो बोलत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच पवार याने महिलेच्या खूनाची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखील पवार, उपनिरीक्षक राजेश गोरे, कर्मचारी मोहन वाळके,बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, कैलास साळुंके यांच्या पथकाने केली.
डीपी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान पवार याने दरोडा टाकून एका महिलेचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. सहा महिन्यापुर्वी झालेल्या गुन्ह्या छडा लावण्यात यश आले आहे.
-गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे
हे ही वाचा :