मनिष तिवारी यांच्या नव्या पुस्तकातील २६/११ हल्ल्याबाबतच्या मजकूरावरुन भाजपची टीका | पुढारी

मनिष तिवारी यांच्या नव्या पुस्तकातील २६/११ हल्ल्याबाबतच्या मजकूरावरुन भाजपची टीका

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी आपल्या नव्या पुस्तकात २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या लिखाणामुळे भाजपने युपीए सरकारवर टीकेची तोफ डागली. युपीए सरकारने २६/११ हल्ल्यानंतर मजबूत प्रतिकार केला नाही आणि राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावली असा आरोप भाजपने केला.

भाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी युपीए सरकार बिनकामाचे आहे हे प्रमाणित झाले असल्याचे सांगितले. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार मनिष तिवारी जे युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते त्यांनी आपल्या पुस्तकात २६/११ च्या हल्ल्यानंतर कारवाई केली नसल्याची टीका केली होती.

यावरूनच भाटिया यांनी ‘मनिष तिवारी यांचे पुस्तक प्रमाणित करते की काँग्रेस नेतृत्व करत असलेले युपीए सरकार असंवेदनशील, बिनकामाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत काळजी नसलेले होते.’ असे वक्तव्य केले. त्यांनी युपीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावली असल्याचा आरोप केला.

दरम्यान, मनिष तिवारी जे आनंतपूर साहिबचे खासदार आहेत त्यांनी ट्विट करुन त्यांचे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबईमधील २६/११ च्या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला २६ नोव्हेंबरला सुरु झाला होता आणि २९ नोव्हेंबर पर्यंत सुरू होता. या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब हा एकटाच जिवंत सापडला होता. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये फाशी देण्यात आली.

Back to top button