लोणी काळभोर: पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनच्या राजू प्रजापतीवर पोलिसांनी अखेर हात टाकला, हाच प्रजापती गावठी बनावट दारू धंद्यातील ‘बडा किंग’ असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिसांसह अनेक बड्यांशी प्रजापतीचे सेटिंग असल्यानेच आत्तापर्यंत त्याला कोणी हात लावत नव्हते. स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रजापती हा बनावट दारू प्रकरणातील ‘रेकॉर्डवरील हस्तक’ असल्याची माहिती असूनही तो अनेक वर्षे खुलेआम धंदा करत होता. त्यामुळे ‘हफ्ता संस्कृती’च्या जोरावरच हा काळाबाजार सुरू होता का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पूर्व हवेली तालुक्याचा मोठा भाग पुणे शहर पोलिस आयुक्तालयात गेल्यानंतर ग््राामीण पोलिस दलात उरुळी कांचन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्यानंतर पूर्व हवेलीतील अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान ग््राामीण हद्दीत हलविल्याची चर्चा होती.
विशेषतः गावठी दारू, बनावट विदेशी दारू, मटका, वाळू, अवैध धंदे यांचे जाळे उरुळी कांचन परिसरात वाढत गेले. स्थानिक पातळीवर राजकीय वरदहस्त आणि पोलिसांच्या कथित आश्रयामुळे हे धंदे बिनधास्तपणे सुरू असल्याचे आरोप वारंवार होत होते. पुणे शहर पोलिस, पिंपरी-चिंचवड पोलिस, पुणे ग््राामीण पोलिस, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त धाडसत्र सुरू केले. या कारवाईत अनेक बडे दारूमाफिया पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
मात्र, शहरात पुरवली गेलेली विषारी गावठी दारू उरुळी कांचन परिसरातून पुरविण्यात आल्याची चर्चा अधिकच गडद झाली. त्याचदरम्यान राजू प्रजापतीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. लोणी काळभोर परिसरात बनावट विदेशी दारू तयार करताना प्रजापती पकडला गेला होता. त्या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या गोदामावर मोठी धाड टाकून बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपले गावठी दारूचे सामज्य विस्तारले आहे.
उरुळी कांचन परिसरातील विविध ठिकाणी प्रजापतीच्या गावठी दारूच्या भट्ट्या सुरू आहेत. स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष, कथित आर्थिक व्यवहार आणि राजकीय पाठबळामुळे त्याचा हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत गेला, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, रेकॉर्डवरील आरोपी असूनही प्रजापतीवर कठोर कारवाई का झाली नाही? त्याला संरक्षण कोणाचे होते? याची चर्चा आता रंगू लागली आहे. विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. जर वेळेत प्रजापतीवर कारवाई झाली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते, अशी भावना मृतांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे.